एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कह्यात घेतलेले फादर स्टेन स्वामी यांच्या निधनावरून काँग्रेसने केले केंद्रशासनाला लक्ष्य !

शहरी नक्षलवाद्याचा पुळका येणारी काँग्रेस ! एकतर काँग्रेसने स्वतः देशाच्या स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षे सत्तेत असतांना देशात माओवादी नक्षलवाद फोफावू दिला आणि आता त्याचा बीमोड करण्यासाठी विविध शहरी नक्षलवाद्यांवर कारवाई चालू असतांना त्यांना काँग्रेस पाठिंबा देत आहे !

फादर स्टेन स्वामी यांचे निधन

पणजी, ६ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रातील एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने गतवर्षी कह्यात घेतलेले फादर स्टेन स्वामी यांचे नुकतेच निधन झाले. ‘फादर स्टेन स्वामी यांचे निधन ही एक हत्या आहे’, असा आरोप करून गोव्यातील काँग्रेसने केंद्रातील भाजप शासनाला लक्ष्य केले आहे.

एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने गतवर्षी कह्यात घेतलेले फादर स्टेन स्वामी यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले. फादर स्टेन स्वामी यांच्यावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याचा विशेषत: बंदी असलेचा ‘सी.पी.आय्. (माओवादी) संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवला होता. फादर स्टेन स्वामी हे नक्षलवादी होते आणि त्यांना देशात अशांतता निर्माण करायची होती, असा आरोप ‘एन्.आय.ए.’ने केला होता. ३१ डिसेंबर २०१७ मध्ये भिमा-कोरेगाव येथे झालेल्या एल्गार परिषदेत त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या प्रक्षोभक भाषणामुळे परिषदेच्या दुसर्‍या दिवशी दंगल उसळली होती.

फादर स्टेन स्वामी यांच्या निधनावरील शोकसंदेशात गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणतात, ‘‘न्यायालयाकडून जामीन मिळण्याच्या आदेशाची वाट पहात असतांनाच वयाच्या ८४ व्या वर्षी फादर स्टेन स्वामी यांना मरण आले. असंवेदनशील आणि दायित्वशून्य केंद्रशासनाने आदिवासींच्या कल्याणासाठी स्वत:चे जीवन व्यतीत केलेल्या एका सज्जन आणि दयाळू व्यक्तीची हत्या केली, असेच म्हणावे लागेल. (साध्वी प्रज्ञासिंह  ठाकूर यांच्यावर अत्याचार झाले त्याविषयी काँग्रेसला असेच म्हणायचे आहे का ? – संपादक) मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी लढणार्‍या फादर स्टेन स्वामी यांना आलेले मरण अत्यंत दुर्दैवी आहे. (मानवी हक्कांचे रक्षण कि त्याआड नक्षलवादी कारवाया आणि अशिक्षित आदिवासींचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर ? – संपादक) त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक, तसेच अनुयायी यांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो.’’

काँग्रेस पक्षाने फादर स्टेन स्वामी यांच्या निधनाला ‘क्रूर हत्या’ असे संबोधून या घटनेचा निषेध करण्यासाठी पणजी येथील आझाद मैदानात निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (फादर स्टेन ८४ व्या वर्षी रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत झाल्यावर त्याला ‘क्रूर हत्या’ म्हणायचे आणि सरकारला उत्तरदायी धरायचे, तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सत्ताकाळात  गोरक्षकांचे आंदोलन उधळून लावण्यासाठी गोळीबार करून काही गोरक्षकांना मारले गेले, त्याला काय म्हणायचे ? – संपादक)