भाजपने प्रतिविधानसभा भरवल्याचे विधानसभेत पडसाद !
मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वादळी ठरला. पहिल्या दिवशी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर भाजपने विधीमंडळाच्या पायर्यावर बसून प्रतिविधानसभा घेतल्याचे पडसाद विधानसभेत उमटले. भाजपने भरवलेल्या प्रतिविधानसभेच्या विरोधात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात तक्रार केली. विधीमंडळ परिसरात ध्वनीक्षेपक, ‘माईक’ वापरायला अनुमती कुणी दिली ? असा प्रश्न विचारला. सत्ताधारी सदस्यांनीही प्रतिविधानसभेतील ‘माईक’ आणि ‘ध्वनीक्षेपक’ यांवर आक्षेप नोंदवला. त्यानंतर तालिका अध्यक्ष म्हणून पदावर बसल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिविधानसभेतील ‘माईक’ आणि ‘ध्वनीक्षेपक’ यंत्रणा बंद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सुरक्षारक्षकांकडून प्रतिविधानसभेतील ध्वनीक्षेपक काढून घेण्यात आले.
अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून प्रतिविधानसभा भरवून सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. याविषयी आमदार भास्कर जाधव म्हणाले की, विधानसभेत शासकीय कामाशिवाय अन्य कोणतेही कार्यक्रम करता येत नाहीत. विधीमंडळात माजी आमदारांकडून खासगी कागदपत्रे वितरित केली जातात. नियमांची पायमल्ली केली जात आहे. हे सरकार सर्वांना समवेत घेऊन चालणारे असल्याने विरोधी पक्षातील आमदारांनी सभागृहातील कामकाजात भाग घ्यावा, अशी त्यांनी विनंती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी प्रतिविधानसभेतील ध्वनीक्षेपक जप्त करण्याची मागणी केली.