‘दलितांना सन्मान द्यायला अल्प ठरल्याने ते धर्मांतर करून ख्रिस्ती होतात !’ – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

  • दलितांना सन्मान न दिल्याने ते ख्रिस्ती होत नसून खिस्ती मिशनरी त्यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात आणि नंतर वार्‍यावर सोडतात, ही वस्तूस्थिती आहे. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांना आळा न घातल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे, याविषयी राव का बोलत नाहीत ?
  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जातीच्या नावाखाली केवळ राजकीय स्वार्थासाठी राजकारण केल्याने दलितांना सन्मान मिळाला नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले असते, तर आज असे बोलण्याची वेळ आली नसती !
  • हिंदु धर्मामध्ये जातपात नाही, तर वर्णव्यवस्था आहे आणि ती सर्वांना समान सन्मान देते. हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याने हिंदू जातीपातीमध्येच अडकले आणि आज असे बोलण्याची वेळ आली, हे सर्वपक्षियांना लज्जास्पद आहे !

भाग्यनगर (तेलंगाणा) – जर दलित समाजातील लोक ख्रिस्ती धर्म स्वीकारत असतील, तर त्यासाठी आपण स्वत:ला दोषी ठरवले पाहिजे. आपण त्यांचे संरक्षण करण्यात अल्प पडतो. जेव्हा हे लोक धर्मांतर करतात, तेव्हा त्यांना तो मान दिला जातो, जो दलित असल्याने आपण देत नाही. (धर्मांतर करतांना देण्यात येणार मान हा केवळ नाटकी असतो, नंतर त्यांना तुच्छच लेखले जाते, हे राव का सांगत नाहीत ? तसेच दलितांसाठी वेगळे चर्च असते. उच्चवर्णीय ख्रिस्ती त्यांच्यामध्ये मिसळत नाहीत, यावर राव सोयीस्कररित्या मौन बाळगत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक) मी स्वत: हिंदू आहे; मात्र दलितांना आजही गरिबीला तोंड देत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, हे पाहून मला फार दु:ख होते, असे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कामारेड्डी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.

राव पुढे म्हणाले की, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन गरीब आणि दलित यांना साहाय्य करून त्यांना या गरिबीतून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.