साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सर्व साधकांना सध्याच्या घोर आपत्काळात साधना करून जीवनमुक्त होण्याची अमूल्य संधी लाभली आहे. आध्यात्मिक उन्नतीद्वारे मनुष्यजन्माचे सार्थक करण्याचे ध्येय लक्षात घेऊन ‘स्वतःचा प्रत्येक क्षण व्यष्टी-समष्टी साधनेसाठी दिला जात आहे ना’, याचा प्रत्येक साधकाने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. ‘वेळ अमूल्य आहे. एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. सामाजिक माध्यमांचा अनावश्यक वापर करून वेळ वाया घालवू नका !

‘काही साधक ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘टेलीग्राम’, ‘इन्स्टाग्राम’ इत्यादींसारख्या सामाजिक माध्यमांवर सक्रीय राहून साधनेचा अमूल्य वेळ वाया घालवतात. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ‘कुटुंबियांचा गट’, ‘शाळा-महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींचा गट’, ‘कार्यालयातील सहकार्‍यांचा गट’, ‘गृहनिर्माण संकुलातील सभासदांचा गट’ इत्यादी अनेक गट बनवले जातात. अशा गटांमध्ये थोड्या थोड्या वेळाने ‘काही संदेश आले का ?’, हे पहाण्यासाठी वेळ दिला जातो. काही साधक अशा गटांमध्ये ‘सुप्रभात’, ‘शुभ रात्री’, ‘सुवचने’, ‘विनोद’, ‘व्हिडिओ’ इत्यादी पाठवून स्वतःसह इतरांना वेळ वाया घालवतात. ‘व्हॉट्स अ‍ॅप’सह ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘टेलीग्राम’, ‘इन्स्टाग्राम’ आदी सामाजिक माध्यमांवरही साधकांचा पुष्कळ वेळ वाया जातो. सामाजिक माध्यमांच्या संदर्भात साधनेची होणारी ही हानी टाळण्यासाठी पुढील दृष्टीकोन लक्षात ठेवा.

अ. साधक अनावश्यक संदेश-व्हिडिओ, तसेच स्टेट्स पहाण्यात वेळ घालवत असल्याने त्यांची बहिर्मुखता वाढते. साधनेसाठी आवश्यक नसलेले मायेतील विचार वाढून साधना व्यय होते. संदेश पाठवणार्‍या साधकाने स्वतःसह अन्य साधकाचाही साधनेतील वेळ वाया घालवल्याने त्याच्या साधनेची हानी होते. तसेच संदेश वाचणारा साधक स्वतःच्या साधनेचा अमूल्य वेळ वाया घालवत असल्याने त्याच्याही साधनेची हानी होते.

आ. साधकाने साधनेत उन्नती करून मनावरील संस्कार न्यून करणे अपेक्षित असते. सामाजिक माध्यमांवरील विनोद, मनोरंजन, वृत्ते इत्यादी पाहिल्याने साधकाच्या मनावर नवीन संस्कार वाढतात.

इ. काही साधक रात्रीच्या वेळी सामाजिक माध्यमांवरील अनावश्यक संदेश वाचणे किंवा व्हिडिओ पहाणे यांमध्ये काही घंटे वाया घालवत असल्याने त्यांची साधनाही व्यय होते. तसेच रात्रीच्या वेळी असे संदेश वाचल्याने झोपेपर्यंत मनावर त्याचा प्रभाव रहातो आणि अनिष्ट शक्तींचे आवरणही येते. याचा परिणाम सकाळी उठण्यापासून ते दिवसभरातील सेवांवर होतो.

ई. सामाजिक माध्यमांचा अतिवापर, हे एक प्रकारचे व्यसनच आहे. खरे तर सतत भ्रमणभाष वापरल्यामुळे डोकेदुखी, मानदुखी, डोळ्यांच्या व्याधी इत्यादी शारीरिक व्याधी, तसेच अनेक मानसिक व्याधी होतात. सामाजिक माध्यमांच्या सततच्या वापराने कार्यक्षमता न्यून होते.

२. सामाजिक माध्यमांचा अतीवापर टाळण्यासाठी कृतीशील प्रयत्न करा !

सामाजिक माध्यमांचा अतिवापर टाळण्यासाठी साधकांनी कृतीशील प्रयत्न करायला हवेत. अनावश्यक सर्व गटांमधून बाहेर पडणे, अनावश्यक संदेश-व्हिडिओ न पहाणे, त्यांची देवाणघेवाण न करणे, समष्टी साधनेला पूरकच सामाजिक माध्यमांचा वापर करणे आणि अनावश्यक वापर टाळण्यासाठी स्वयंसूचना घेणे अथवा आवश्यकतेनुसार शिक्षापद्धतीचा अवलंब करणे, असे प्रयत्न साधकांनी प्रामाणिकपणे करावेत.

३. दूरचित्रवाणी, तसेच यू ट्यूब यांवरील कार्यक्रम पहाण्यात वेळ घालवू नका !

काही साधक कोरोना महामारीच्या काळात सुट्टीचा उपभोग घेतल्याप्रमाणे वेळ वाया घालवत असल्याचे लक्षात आले आहे. काही साधक दूरचित्रवाणी, तसेच यू ट्यूब यांवरील विविध कार्यक्रम, मालिका, प्रवचने इत्यादी पहाण्यासाठी अकारण वेळ देतात. काही साधक यू ट्यूबवरील अभिनव पाककृती पाहून त्या बनवण्यासाठी वेळ देतात. खरेतर आपत्काळाची तीव्रता अधिक असतांना साधकांनी साधनेची गती वाढवणे अपेक्षित आहे. साधकांनो, आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक असतांना अशा प्रकारे वेळ वाया घालवू नका !

४. साधनेसाठी प्रत्येक क्षण वापरण्यासाठी करावयाचे प्रयत्न

अ. या आपत्काळात परिणामकारक साधना करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सर्वत्रच्या साधकांनी स्वतःची क्षमता, प्रकृती, कौटुंबिक दायित्व इत्यादी लक्षात घेऊन स्वतःचा २४ घंट्याचा दिनक्रम निश्‍चित करावा.

आ. या दिनक्रमात दैनंदिन वैयक्तिक कृती, व्यष्टी साधना आणि सत्सेवा यांसाठी द्याव्या लागणार्‍या वेळेचे ईश्‍वराला अपेक्षित नियोजन करून ते स्वतःच्या उत्तरदायी साधकाला दाखवावे.

इ. ‘या नियोजनाप्रमाणे कृती होत आहेत ना ?’, याचे नियमित प्रामाणिकपणे दैनंदिनी लिहून गुरुचरणी आत्मनिवेदन करावे आणि त्याचा आढावा उत्तरदायी साधकाला द्यावा.

५. आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन साधनेसाठी वेळ द्या !

साधकांनो, ‘घोर आपत्काळास प्रारंभ झाला असून संत-भविष्यवेत्ते यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण विश्‍व तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. येणार्‍या भीषण काळात साधना करणेही दिवसेंदिवस कठीण होणार आहे, हे लक्षात घेऊन जागृत अवस्थेतील प्रत्येक क्षण साधनेसाठी कसा वापरला जाईल’, यासाठी तळमळीने प्रयत्न करा ! या आपत्काळात स्वतःच्या साधनेची फलनिष्पत्ती वाढल्यास आध्यात्मिक उन्नती लवकर होईल, याची निश्‍चिती बाळगा !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (९.६.२०२१)

साधकांच्या वेळेच्या नियोजनाच्या संदर्भात उत्तरदायी साधकांचे दायित्व

१. ‘प्रत्येक साधकाची वैयक्तिक कृती, व्यष्टी साधना आणि सत्सेवा यांचे २४ घंट्यांचे नियोजन योग्य प्रकारे झाले आहे का ?’, हे पहाणे उत्तरदायी साधकांचे दायित्व आहे.

२. उत्तरदायी साधकांनी सहसाधकांना दैनंदिन नियोजनात असणार्‍या अडचणी सोडवाव्यात आणि त्यांना साधनेच्या पुढील टप्प्याला नेण्यासाठी प्रयत्न करावेत.

३. उत्तरदायी साधकांनी साधकांची दैनंदिनी नियमितपणे पडताळावी, तसेच साधकांची क्षमता, कौशल्य पाहून ‘त्यांची फलनिष्पत्ती आणि साधनेची गती कशी वाढू शकते’, याचा अभ्यास करावा, उदा. ‘घरातील सेवा करण्यास किती वेळ लागणे अपेक्षित आहे’, ‘नियतकालिकांचे वितरण करण्यास किती वेळ लागत आहे’, ‘सत्संगाच्या पूर्वसिद्धतेसाठी किती वेळ आवश्यक आहे’, ‘एका घंट्यात किती ‘केबी’ लिखाणाचे टंकलेखन व्हायला हवे’ आदींचा अभ्यास करून त्यांना आवश्यक ते दिशादर्शन करावे. साधकांना दिशादर्शन केल्याप्रमाणे त्यांची कृती होत आहे ना, याची निश्‍चिती करावी.

४. वृद्ध, रुग्णाईत, प्राणशक्ती अल्प असलेले किंवा अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असलेले साधक स्वतःच्या क्षमतेप्रमाणे साधना आणि सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात. उत्तरदायी साधकांनी ‘अशा साधकांचे नियोजन त्यांच्या क्षमतेप्रमाणे ईश्‍वराला अपेक्षित होत आहे ना ?’, याचाही अभ्यास करणे अपेक्षित आहे.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (९.६.२०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.