
१. बैलाने मुकुलच्या पोटात जोरात ढुशी मारूनही त्याला फारसे न लागणे
‘माझा मुलगा कु. मुकुल (वय १२ वर्षे) डिसेंबर २०२२ मध्ये एकदा शाळेच्या आवारात मित्रासोबत उभा होता. तेव्हा बैलाने त्याच्या पोटात जोरात ढुशी दिली. देवाच्या कृपेने त्याला विशेष काही लागले नाही. देवानेच त्याचे प्रारब्ध पुष्कळ सुसह्य केले.
२. ‘मुकुलचे रक्षण होऊ दे ’, अशी मारुतिरायाला प्रार्थना केल्यावर ‘मुकुल माझ्याप्रमाणेच भक्ती करील आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मोठी सेवा करील’, असे मारुतीरायाने सांगणे
एक दिवस मी मुकुलचा विचार करत होते. मला त्याची काळजीही वाटत होती. तेव्हा मी मारुतिरायाला ‘मुकुलचे रक्षण होऊ दे ’, अशी प्रार्थना केली. त्या वेळी मारुतिराया मला म्हणाला, ‘अगं, मी आणि मुकुल वेगळे नाही. (लहान असतांना मुकुल सतत हनुमानाच्या अनुसंधानात असायचा.) मी सतत त्याचे रक्षण करत असतो. मुकुलला बैलाने मारले, त्या वेळी माझे तत्त्व जागृत असल्याने त्याला मार लागल्याची विशेष जाणीव झाली नाही. तू त्याची काळजी करू नको. त्याच्यावरील स्वभावदोष आणि अहं यांचे आवरण नष्ट झाले की, त्याला त्याच्यात माझे अस्तित्व असल्याची जाणीव होईल. तो माझ्याप्रमाणेच भक्ती करील आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मोठी सेवा करेल !’
त्यानंतर मला मारुतिरायाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून माझे मन शांत झाले आणि माझी काळजी ७० टक्के न्यून झाली.
३. मुकुलच्या आजारपणात त्याची सेवा करतांना साधिकेने तिच्या देहात साक्षात् सीतामातेला अनुभवणे
५.२.२०२३ या दिवशी रात्री अकस्मात् मुकुलला पुष्कळ ताप आला आणि पुढे ३ – ४ दिवस साधारण १०२ अंश फॅरनहाईट ताप टिकून होता. त्या वेळी देवाने माझ्याकडून मुकुलची शुश्रूषा सेवाभावाने करून घेतली. त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतांना अकस्मात् मला माझ्यामध्ये सीतामातेचे अस्तित्व जाणवू लागले. मी त्रयस्थपणे माझ्याकडे पहात होते. त्या वेळी मला पुष्कळ आनंद होत होता. ‘आतापर्यंत मी कधी सीतामातेविषयी भाव ठेवून प्रयत्न केले नाहीत, तरी मला माझ्यात तिचे अस्तित्व का जाणवत आहे ?’, असे विचार जिज्ञासेमुळे माझ्या मनात येऊ लागले. त्या वेळी मला मारुतिरायाने सांगितलेले ‘मुकुल आणि मी वेगळे नाही’, हे शब्द एकदम आठवले. माता सीता मारुतिरायाला आपला पुत्र मानते. त्यामुळे ‘ती स्वतःच त्याच्या सेवेसाठी आली आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. मी माझ्या देहात साक्षात् सीतामातेला अनुभवले. तिने माझा देह पवित्र केला. ही स्थिती मी जवळ जवळ १० – १५ मिनिटे अनुभवत होते.
४. कु. मुकुलविषयीची अन्य सूत्रे
४ अ. मुकुलच्या अंगावर अनेक वेळेला दैवी कण आढळतात.
४ आ. मंडल घालण्याचे लाभ अनुभवल्यावर मुकुलची देवावरील श्रद्धा वाढणे : स्वतःच्या त्रासावर मात करता येण्यासाठी एका साधिकेने मुकुलला स्वतःभोवती झोपतांना मंडल घालण्याचे महत्त्व सांगितले. त्यानंतर मुकुलने मंडल घालायला आरंभ केला. त्याचा परिणाम असा झाला की, पूर्वी शाळेत मुले त्याला पुष्कळ त्रास द्यायची. तो त्याचा त्रास न्यून झाला. एक शिक्षिका नेहमी त्याच्यासमोर सनातनच्या विरोधात काहीतरी बोलायच्या. अकस्मात्च त्यांना एका वर्षासाठी बाहेर जावे लागले. या सर्व प्रसंगांमुळे मुकुलची देवावरील श्रद्धा वाढली.
४ इ. मुकुलची भौतिक गोष्टीतील आसक्ती न्यून झाल्याचे जाणवणे : एकदा मुकुलच्या बाबांनी त्याला बाहेर फिरायला नेले होते. त्या वेळी ‘त्याची आसक्ती न्यून झाली आहे’, असे मला जाणवले. त्याला भौतिक गोष्टींत आनंद मिळत नव्हता. ‘देव त्याला टप्प्याटप्प्याने साधनेचे महत्त्व शिकवत आहे’, असे मला वाटले.
५. मुकुलचे लक्षात आलेले स्वभावदोष
अपेक्षा करणे, तुलना करणे, न स्वीकारणे, हट्टीपणा आणि इतरांचे न ऐकणे.
‘हे गुरुमाऊली, हे सर्व मी केवळ तुमच्या कृपेमुळे अनुभवू शकले. ‘कु. मुकुलला साधनेत पुढच्या पुढच्या टप्प्याला न्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
गुरुचरणी समर्पित,
– सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२५.७.२०२४)