१.१.२०२५ या दिवशी ठाणे येथील यशवंत सदाशिव शहाणे (वय ८० वर्षे) यांचे निधन झाले. १०.१.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे जावई श्री. अभय विजय वर्तक यांना त्यांच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. स्वतःच्या आजाराविषयी कळल्यावरही स्थिर असणे
‘१४.११.२०२४ या दिवशी सकाळी ७ वाजता माझे सासरे यशवंत शहाणे (वय ८० वर्षे) यांना मी रुग्णालयात घेऊन गेलो. त्या वेळी ‘त्यांची स्थिती गंभीर असून त्यांना पक्षाघात झाला आहे’, हे त्यांच्या लक्षात आले होते; परंतु तरीही ते अगदी स्थिर होते.
२. पूर्वी छोटी वैद्यकीय चाचणी करण्याची भीती वाटत असणे आणि आता मोठी चाचणी करतांनाही भीती न वाटणे
रुग्णालयात गेल्यावर मी शहाणेकाकांना ‘एम्.आर्.आय. (Magnetic Resonance Imaging) (टीप)’ करायचे आहे’, असे सांगितले. यापूर्वी कोणत्याही छोट्या वैद्यकीय चाचण्या करायच्या असल्या, तरी त्यांना पुष्कळ भीती वाटायची. ‘एम्.आर्.आय.’ या चाचणीचे यंत्र दिसायला अवाढव्य असते आणि चाचणी करतांना रुग्णाचे जवळजवळ पूर्ण शरीर त्याच्या आतमध्ये जाते. मी काकांना त्या यंत्राजवळ घेऊन गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘काका, घाबरू नका. प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) समवेत आहेत.’’ त्यावर ते हसतमुखाने म्हणाले, ‘‘हो. काही अडचण नाही.’’ त्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकून मला आश्चर्यच वाटले; कारण त्यांची प्रकृती तशी नाही. ‘देव संकटात सर्व साधकांना कसे बळ देतो !’, याची प्रचीती मला आली.
टीप – एम्.आर्.आय. (Magnetic Resonance Imaging) : हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.
३. पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काकांना आश्रमात बोलावल्यावर त्यांनी त्वरित न जाणे आणि आता काकांना त्या चुकीची खंत वाटणे
रुग्णालयात भरती केल्यावर २ – ३ दिवसांनी मी त्यांना विचारले, ‘‘काका, आश्रमात जाऊया का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हो. मला परात्पर गुरु डॉक्टरांनी पूर्वीच आश्रमात बोलावले होते; परंतु तेव्हा मी त्यांना स्पष्टीकरण दिले की, माझी आई घरी असते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी बोलावल्यावर मी लगेच आश्रमात गेलो नाही’, ही माझी चूक झाली.’’ त्यांच्या या वाक्यातून त्यांची चुकीविषयीची खंत जाणवत होती.
४. ‘काका सुख-दुःखाच्या पलीकडे गेले आहेत’, असे कुटुंबियांना जाणवणे
‘माझ्यावर असे संकट का आले ?’, अशा प्रकारचे एकही नकारात्मक किंवा निराशाजनक वाक्य काका शेवटच्या क्षणापर्यंत एकदाही बोलले नाही. ‘त्यांना आजारपणाचे दुःख नव्हते’, असे त्यांच्या वागण्यातून मला पदोपदी जाणवले. शेअर बाजार आणि विविध अधिकोष यांमध्ये त्यांची गुंतवणूक होती. गुंतवणूक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता; परंतु दीड मासात त्यांनी त्याविषयी कधीही काळजी व्यक्त केली नाही. ते नुकतेच नवीन घरात रहाण्यास आले होते. ‘नवीन घराविषयीही त्यांच्या मनात आसक्ती होती’, असे मला वाटले नाही. ते जणू ‘सुख-दुःखाच्या पलीकडे गेले आहेत’, असे घरातील सर्वांना जाणवले.
५. पुष्कळ वेदना होत असूनही चिडचिड न करणे
रुग्णालयात शहाणेकाकांच्या समवेत असलेल्या अन्य रुग्णांची परिस्थिती पहाता ‘काका त्यांना होणार्या प्रचंड वेदना सहजतेने सहन करत आहेत’, असे लक्षात येत होते. पुष्कळ वेदना होत असूनही त्यांनी कधी चिडचिड केली नाही. ‘साधनेमुळे व्यक्तीत पालट कसा होतो आणि देव त्याचे प्रारब्ध कसे सुसह्य करतो ?’, हे माझ्या लक्षात आले.
६. ईश्वराच्या अनुसंधानात असणे
काका पूर्वी विविध आजारांवरील उपचारांसाठीच्या मुद्रा करून २ घंटे नामजप करत असत. ‘विविध आजार दूर करण्यासाठी कोणत्या मुद्रा करायच्या ?’, हे ते इतरांना नेहमी सांगत. त्यांच्या या आजारपणात ते उजव्या हाताने सतत मुद्रा करण्याचा प्रयत्न करत होते. ‘ते बहुतांश वेळा ईश्वराच्या अनुसंधानात आहेत’, असे मला त्यांच्या चेहर्यावरून जाणवायचे. त्यांना बर्याचदा रात्रभर झोप लागत नसे, तरीही ते नामजप करत असत.
७. ‘काका अंतर्मुख होत आहेत’, असे जाणवणे
काकांच्या आजारपणात दीड मासाच्या कालावधीत अनेक नातेवाईक आणि मित्र त्यांना सतत भेटायला येत होते. तेव्हा त्यांनी कुणाशीही गप्पा मारल्या नाहीत. काका त्यांच्या प्रश्नांना ‘हो’ किंवा ‘नाही’, एवढेच उत्तर देत असत. ‘ते अंतर्मुख होत आहेत’, असे मला जाणवले.
८. ‘परिचारिकेच्या माध्यमातून श्रीकृष्णच काकांची शुश्रूषा करत आहे’, असे जाणवणे
शहाणेकाकांना पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांची जीभ, श्वसननलिका आणि अन्ननलिका यांत काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे त्यांना तोंडावाटे अन्न देणे शक्य नव्हते. नाकातून नळीवाटे त्यांना द्रवपदार्थ नियमित दिले जात होते, तसेच अन्य अडचणी पहाता त्यांना प्रशिक्षित परिचारिकेची आवश्यकता होती. एका संस्थेच्या माध्यमातून सौ. दिव्या विनायक गायकवाड या परिचारिका म्हणून उपलब्ध झाल्या. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत त्यांनी इतक्या प्रेमाने आणि काटेकोरपणे काकांची सेवा केली की, सध्याच्या काळात असे उदाहरण सहसा आढळणार नाही. त्यामुळे ‘जणू साक्षात् भगवान श्रीकृष्णच त्याच्या भक्ताची सेवा करत आहे’, असे आम्ही घरातील सर्व जण अनुभवत होतो.
९. परिचारिकेने काकांना नामजप करण्याची आठवण करून देणे आणि स्वतःही नामजपाला आरंभ करणे
मी आणि माझे कुटुंबीय काकांसाठी ‘महाशून्य’ हा नामजप करत होतो. आम्ही काकांनाही नामजप करायला सांगत होतो आणि नामजप भ्रमणभाषवरही लावलेला होता. आमचे पाहून सौ. दिव्या या परिचारिकाही ‘काकांना अधूनमधून नामजप करण्याची आठवण करणे, त्यांना न्यास करायला सांगणे’ इत्यादी कृती करू लागल्या. सौ. दिव्या यांना नामजपाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनीही नामजप चालू केला.
१०. निधनाच्या एक दिवस आधी मृत्यूची भीती वाटत नसल्याचे सांगून ‘सर्व भगवंताच्या इच्छेप्रमाणे होऊ दे’, अशी प्रार्थना करणे
काकांच्या निधनाच्या एक दिवस आधी रात्री काकांना झोप येत नव्हती. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘काका, काही चिंता वाटत आहे का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘चिंता कसली करायची ?’’ त्यांचे ते शब्द ऐकून मला बरे वाटले. नंतर मी धाडस करून त्यांना विचारले, ‘‘मृत्यूची भीती वाटत आहे का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘जराही नाही.’’ मी पुढे विचारले, ‘‘देवाकडे काय प्रार्थना करूया ?’’ तेव्हा ते पटकन म्हणाले, ‘‘तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.’’ ‘त्यांनी असे म्हणणे’, हे त्यांच्यातील साधकत्वाचे लक्षण होते’, असे मला वाटते.
११. काका मला नेहमी म्हणत, ‘‘सनातनने मला अध्यात्म शिकवून आनंदी केले. सनातनचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.’’
गेल्या २० वर्षांत मला माझ्या सासर्यांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. असे शिस्तबद्ध सासरे मिळाल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अभय विजय वर्तक (कै. यशवंत शहाणे यांचे जावई), धर्मप्रचारक, सनातन संस्था. (४.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |