आधुनिक वैद्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने पाळला निषेधदिन !

पुणे – कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना अहोरात्र सेवा देणार्‍या आधुनिक वैद्यांवर प्राणघातक आक्रमण होण्याच्या घटना घडल्या आहेत. आधुनिक वैद्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने १८ जून या दिवशी निषेधदिन पाळला. खासदार गिरीश बापट यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांशी भेट घेऊन चर्चा केली. तसेच संसदेत रखडलेला कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी पुढाकार घेण्याचे आश्‍वासन दिले.

विविध मागण्यांसाठी १८ जून या दिवशी आधुनिक वैद्यांनी काळ्या फिती आणि काळे मास्क लावून निषेधदिन पाळला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आधुनिक वैद्यांवर होणारी आक्रमणे, रुग्णालयात केली जाणारी तोडफोड अशा घटना दुःखदायक आणि क्लेशकारक आहेत. नागरिकांनी अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊन आधुनिक वैद्यांना सहकार्य करावे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आधुनिक वैद्यांशी ऑनलाईन संवाद साधत सांगितले.