१. गृहकृत्य साहाय्यक नीला यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून ‘ते देव आहेत’, असे सांगणे
‘ नीला आमच्या गृहकृत्य साहाय्यक (घरकाम करण्यासाठी येणार्या मावशी) आहेत. त्यांनी पुष्कळ कष्ट करून आपल्या २ मुलांचे संगोपन केले. आता ती मुले मोठी होऊन त्यांचा संसार चालू आहे. एके दिवशी मी नीला यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवून ‘त्यांच्याकडे पाहून तुला काय वाटते ?’, असे विचारले. तेव्हा त्या लगेच म्हणाल्या, ‘‘ते मला देवाप्रमाणे दिसत आहेत. तुम्ही किती भाग्यवान आहात ! तुम्ही शिकलेल्या असल्यामुळे आश्रमासाठी सेवा करू शकता.’’ प्रत्यक्षात नीला यांनी परात्पर गुरु डॉक्टरांबद्दल काही ऐकलेले नाही किंवा त्यांना कधी पाहिलेही नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली. मला जी गोष्ट कळायला एवढी वर्षे लागली, ते त्यांनी पहिल्या घटकेत सहजतेने सांगितले. त्यानंतर मला नीला यांच्यातील पुढील गुणवैशिष्ट्ये आठवली.
२. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. प्रामाणिक आणि समाधानी वृत्ती : नीला प्रामाणिक आणि विश्वासू आहेत. पुष्कळ कष्ट करून जे मिळते, त्यात त्या समाधानी आहेत. त्यांना पैशाची हाव नाही. आमच्या घरी काही दिवस रहाण्यासाठी २ साधक आले होते. ते परत जातांना त्यांनी नीला यांना पैसे देऊ केले. तेव्हा त्यांनी ते पैसे घेतले नाहीत.
२ आ. त्या सनातनची उत्पादने, उदा. उदबत्ती, कापूर आणि अत्तर यांचा वापर करतात.
२ इ. श्रीकृष्णाप्रती भाव : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला लड्डू गोपाळाची एक मूर्ती दिली आहे. मी ती मूर्ती स्वयंपाकघरात ठेवली आहे. नीला त्याच्याशी सतत बोलत असतात. त्याने (गोपालाने) सर्वकाही दिल्याविषयी त्या कृतज्ञता व्यक्त करतात, तर त्याला कधी चेन्नईमध्ये पाऊस पाडण्यासाठी सांगतात.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे सौ. नीला यांच्या माध्यमातूनही सत्संग मिळत असल्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (२८.१०.२०२०)