आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धेमुळे इंग्लंडचे खेळाडू आमचे तळवे चाटत आहेत !

इंग्लंडमधील वर्णद्वेषी मानसिकतेवरून भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांचे विधान !

भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर

नवी देहली – आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धा चालू झाल्यापासून इंग्लंडचे खेळाडू आमचे तळवे चाटत आहेत. मला आश्‍चर्य याचे आहे की, केवळ पैशामुळे ते आता आमचे बूट चाटत आहेत; मात्र आरंभीच्या काळात त्यांचे रंग काय होते, हे माझ्यासारख्या लोकांना ठाऊक आहे. आता पैशाच्या संदर्भात इंग्लंडच्या खेळाडूंचा दृष्टीकोन पूर्णपणे पालटला आहे. त्यांचे मत आहे की, भारतात पैसे कमावता येतात, असे विधान भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.

जुन्या वादग्रस्त ट्वीटमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसन याला निलंबित केल्याने क्रिकेटमधील वर्णद्वेषाचे सूत्र पुन्हा चर्चेत आले आहे. त्यावर मत मांडतांना इंजिनियर यांनी वरील विधान केले.

फारूख इंजिनियर पुढे म्हणाले की, जेव्हा मी वर्ष १९६० च्या दशकात इंग्लंडमध्ये  पहिल्यांदाच काऊंटी क्रिकेट खेळायला आलो होतो, तेव्हा लोक माझ्याकडे भारतातून आलेला व्यक्ती म्हणून वेगळ्या दृष्टीने पहात असत. लँकेशायरकडून खेळत असतांना मी दोन वेळा वांशिक भाष्य केले. त्या टिप्पण्या वैयक्तिक नव्हत्या. मला लक्ष्य केले गेले; कारण मी भारतातून आलो होतो आणि माझा बोलण्याचा संदर्भ वेगळा होता. मला वाटते, की माझे इंग्रजी त्यांच्यापेक्षा चांगले आहे. म्हणून त्यांना समजले की, आपण फारूख इंजिनियरचा सामना करू शकत नाही. त्यांना माझा संदेश मिळाला. मी त्यांना जोरदार उत्तर दिले. एवढेच नव्हे, तर मी माझ्या फलंदाजी आणि यष्टीरक्षण यांमुळे स्वत:ला सिद्ध केले. मी देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम केले आणि याचा मला अभिमान आहे.