पंतप्रधान सर्व प्रश्‍न सकारात्मकतेने सोडवतील, अशी अपेक्षा आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषय मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण देहली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही मांडलेले सर्व विषय अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले. ज्या विषयांची पंतप्रधानांशी चर्चा झाली, त्याविषयीची पत्रेही त्यांना दिली आहेत. त्या विषयांची माहिती घेण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. हे सर्व प्रश्‍न ते सकारात्मकतेने सोडवतील, अशी अपेक्षा आहे, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील विविध प्रश्‍नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ८ जून या दिवशी देहली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी सर्वांमध्ये ९० मिनिटे चर्चा झाली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनामध्ये पत्रकार परिषद घेऊन झालेल्या चर्चेची माहिती दिली.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांकडे राज्यातील संवेदनशील असलेला मराठा आरक्षणाचा विषय मांडण्यात आला. इतर मागासवर्गीय समाजाचे पंचायत राज संस्थेतील आरक्षण, मागासवर्गियांचे शासकीय नोकरीतील अन् पदोन्नतीतील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेची उपलब्धता, वस्तू आणि सेवा कराची रक्कम वेळेत मिळणे, पीक कर्जाप्रमाणे पीक विम्यासाठी अटी शिथिल करणे, चक्रीवादळामध्ये देण्यात येणार्‍या अर्थसाहाय्यातील निकषांमध्ये पालट करणे, १४ व्या वित्त आयोगातील थकित निधी मिळणे, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हे विषय मांडण्यात आले. या सर्व विषयांची माहिती घेऊन त्यांत लक्ष घालण्याचे आश्‍वासन पंतप्रधानांनी दिले आहे.

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी ! – अशोक चव्हाण

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचे सूत्र मार्गी लागणार नाही. याविषयी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद झाला पाहिजे. केंद्र सरकारकडे अधिकार असतांना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती पंतप्रधानांकडे करण्यात आली.

वस्तू आणि सेवा करावरील भरपाई त्वरित मिळण्यासाठी विनंती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला २४ सहस्र ३०६ कोटी रुपये इतकी वस्तू आणि सेवा कर यांवरील भरपाई मिळणे शेष आहे. कोरोनामुळे सर्वांवर आर्थिक संकट आहे. त्यामुळे हे पैसे लवकर मिळाण्याची विनंती पंतप्रधानांकडे करण्यात आली. सरकार बहुमतात असतांना विधान परिषदेच्या राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या जागा ८ मासांपासून रिक्त असल्याचे सूत्र आम्ही पंतप्रधानांपुढे मांडले. त्यावर निर्णय घेण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या वैयक्तिक भेटीवर मुख्यमंत्र्यांचे भाष्य !

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी ‘पंतप्रधानांसमवेत वैयक्तिक भेट झाली का ?’, असा प्रश्‍न विचारला. त्यावर उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मी कोणतीही गोष्ट कधीही लपवलेली नाही आणि लपवण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही; पण याचा अर्थ ‘नाते तुटले’, असा होत नाही. मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. या भेटीत पंतप्रधानांनी माझी वैयक्तिक विचारपूस केली. ‘युती का तुटली ?’, असा प्रश्‍न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला असता, त्यावर त्यांनी ‘त्यावर दीड वर्षांनी उत्तर का द्यावे ?’, असा प्रतिप्रश्‍न पत्रकारांना केला.