धर्मशिक्षणानेच कौटुंबिक समस्या थांबतील !

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे घरातील सर्व सदस्य एकमेकांच्या सहवासात रहात आहेत. वर्ष २०२० मध्ये जेव्हा दळणवळण बंदी चालू झाली, तेव्हा अचानक मिळालेली सुटी सर्वांनीच ‘एन्जॉय’ केली; परंतु हा कालावधी वाढायला लागला, तसे स्वतःच्या आणि एकमेकांच्या अहंमुळे सहवासातील आनंदाचे क्षण ताणात रूपांतरित होऊ लागले. सहवास नकोसा वाटायला लागला, हे पुढील आकडेवारीवरून लक्षात येत आहे. यामध्ये ज्यांना अत्यंत असह्य झाले, ते पोलिसांकडे गेले. अजून अशी कितीतरी जोडपी असतील, ज्यांनी मान, भय, लज्जा यांखातर पोलिसांची पायरी चढलेली नसेल. याचा अर्थ सर्व कुटुंबांमध्ये सुसंवाद असेल, असेही आपण म्हणू शकत नाही. नवी मुंबई येथे महिला साहाय्य कक्षाकडे चालू वर्षाच्या ४ मासांत पती-पत्नी यांच्यामधील वादाच्या ३३९, तर मागील वर्षी ७६३ तक्रारी आल्या होत्या. महिलांसह आता पुरुषांच्या तक्रारीही वाढत आहेत. परिणामी पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसह कौटुंबिक वादही मिटवावे लागत आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींना एकत्रित रहातांना येणार्‍या अडचणींचे मूळ संस्कारांकडे जाते. एकत्र कुटुंबपद्धती ही भारताची संस्कृती आहे. एका कुटुंबात पूर्वी २५-३० जण आनंदाने रहात होते. असे होण्यामागे वडीलधार्‍यांनी मुले आणि नातवंडे यांवर केलेले संस्कार हेच मूळ होते. आताच्या पिढीमध्ये मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे, मर्यादेबाहेर स्वातंत्र्य आणि स्वैराचार, एकमेकांना समजून न घेणे, छोट्या छोट्या प्रसंगात लगेचच टोकाची भूमिका घेणे, स्वतःला मान मिळावा ही अपेक्षा यांचा ढोबळ मानाने अंतर्भाव आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील व्यक्तींनी साधना न करणे. धर्मशास्त्रानुसार पती-पत्नीमध्ये अधिक देवाणघेवाण असते. यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. साधना करून आपण प्रारब्धावर मात करू शकतो, असे धर्मशास्त्र सांगते; परंतु धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अनेकांना हे ठाऊक नाही. सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम रहाण्याचे मार्गदर्शन धर्म करते. त्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. बदलत्या काळातील समस्या आणि त्यांवरील उपाययोजना यांसाठी धर्मशिक्षणाला पर्याय नाही, हेच खरे !

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी