भारतीय तरुणांना बहकावत असलेला चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्या यांचा असुर !

गेली कित्येक दशके भारतीय तरुणांच्या मनावर हिंदी चित्रपटांनी अधिराज्य गाजवले. अपवाद वगळता बहुतांश चित्रपटांनी युवा पिढीवर चुकीचे संस्कारच केले. त्यामुळे वास्तव आणि चित्रपटातील जग हे वेगळे असते, हे कळण्याचे तारतम्यही तरुणांनी हरवले !

प्रतिकात्मक छायाचित्र

चित्रपटातील श्रीमंती थाटाचे संस्कार आणि नवरूढी (फॅशन) याप्रमाणे वागणे म्हणजे प्रतिष्ठितपणा असा चुकीचा संस्कार नकळत यांमुळे झाला. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे केशभूषा, वेशभूषा आदी करणे हा महाविद्यालयीन तरुणाईच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. तरुण वयात वाटणार्‍या लैंगिक आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम हाच बहुतांश भारतीय चित्रपटांचा केंद्रबिंदू झाल्याने गेल्या काही दशकांत काही प्रमाणात बहुतांश भारतीय तरुणांचे भावविश्व तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. आता या प्रेमाची जागा ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’सारख्या माध्यमातून दाखवले जाणारे चित्रपट किंवा मालिका यांनी घेतली आहे. अश्लीलता आणि हिंसाचार यांनी ओतप्रोत भरलेले हे चित्रपट किंवा मालिका तरुणांच्या मनावर पुष्कळ अधिक प्रमाणात कुसंस्कार करतात. त्यातून बलात्कार आणि अन्य गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात.

तरुणांनो, चित्रपटांचे उदात्तीकरण टाळा !

वैद्या (कु.) माया पाटील

काही वर्षांपूर्वी अभिनेता रजनीकांत यांचा ‘कबाली’ हा हिंदी भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाला. १६० कोटी रुपये व्यय केलल्या या चित्रपटाने २५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आणि प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ज्या काही घटना भारतामध्ये आणि भारताबाहेर घडल्या त्या अचंबित करणार्‍या होत्या. सध्या देशातील समस्यांचा विचार केल्यास भ्रष्टाचार, महागाई, दुष्काळ, पूरसदृश स्थिती, आतंकवादी आक्रमणे, हिंदूंवर होणारे अत्याचार, बलात्कार या आणि यांसारख्या असंख्य समस्या सामान्य माणसाला जगणे कठीण करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर ‘कबाली’ चित्रपट आणि रजनीकांत यांच्या प्रेमाखातर तरुणाईने पहाटेपासून रांगा लावणे, फटाके फोडणे, समारंभ आदी केलेल्या कृती डोके सुन्न करणार्‍या होत्या.

– कु. माया पाटील, सनातन आश्रम देवद, पनवेल.

तरुण चित्रपटांच्या माध्यमातून चोरीच्या नवनवीन कला, व्यसन करणे, निर्लज्जपणा आणि व्यभिचार शिकतात !

चित्रपटापासून तरुण चोरीच्या नवनवीन कला, दरोडा घालणे, मद्य पिणे, निर्लज्जपणा आणि व्यभिचार शिकले. चित्रपटांमुळे आपल्या तरुण-तरुणींमध्ये एकप्रकारचा स्वच्छंदपणा वाढत आहे. याची कित्येक उदाहरणे तर आपल्या समोरच आहेत. कुणास ठाऊक की, लाखो-करोडो तरुण-तरुणींवर याचा किती विषारी परिणाम झाला असेल ? तरीसुद्धा याला आपण मनोरंजनाचे साधनच मानत आहोत, हा किती नादानपणा आहे !  – (संपादक, ऋषिप्रसाद, २०००)