म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी राज्यशासनाकडून खासगी रुग्णालयांचे दर निश्‍चित !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – म्युकरमायकोसिसच्या (काळ्या बुरशीच्या) रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्यशासनाने दर निश्‍चित केले आहेत. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यामुळे यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली. ही अधिसूचना ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू रहाणार आहे.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे माहिती देतांना म्हणाले…

१. सध्या महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयांतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जात आहेत.

२. खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्या रुग्णालयांनी रुग्णाला पूर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आह. अधिक दर आकारणार्‍या रुग्णालयांवर भरारी पथकांच्या माध्यमातून पुन्हा पडताळणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे.

म्युकरमायकोसिसवरील उपचारांचे दर पुढीलप्रमाणे !

१. वॉर्डमधील अलगीकरण – ‘अ’ वर्ग शहरांसाठी ४ सहस्र रुपये, ‘ब’ वर्ग शहरांसाठी ३ सहस्र रुपये आणि ‘क’ वर्ग शहरांसाठी २ सहस्र ४०० रुपये (यात आवश्यक ती देखरेख, परिचारिका, चाचण्या, औषध, खाटा यांचा व्यय आणि जेवण यांचा समावेश) मोठ्या चाचण्या आणि पडताळण्या, तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधे यातून वगळली आहेत.

२. व्हेंटिलेटरविना आयसीयू आणि विलगीकरण – ‘अ’ वर्ग शहरांसाठी ७ सहस्र ५०० रुपये, ‘ब’ वर्ग शहरांसाठी ५ सहस्र ५०० रुपये आणि ‘क’ वर्ग शहरांसाठी ४ सहस्र ५०० रुपये

३. व्हेंटिलेटरसह आयसीयू आणि विलगीकरण – ‘अ’ वर्ग शहरांसाठी ९ सहस्र रुपये, ‘ब’ वर्ग शहरांसाठी ६ सहस्र ७०० रुपये आणि ‘क’ वर्ग शहरांसाठी ५ सहस्र ४०० रुपये

वर्गीकरण

‘अ’ वर्ग शहर – मुंबई, तसेच महानगर क्षेत्र (मीरा-भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर, पनवेल महापालिका), पुणे, तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर (नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) ‘ब’ वर्ग शहर – नाशिक, अमरावती, संभाजीनगर, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये

‘क’ वर्ग शहर – अ आणि ब गट वगळता सर्व भाग

म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रकर्म अत्यावश्यक असल्याने राज्य सरकारने २८ प्रकारच्या शस्त्रकर्मांसाठीचा व्यय निश्‍चित केला आहे. ‘अ’ वर्ग शहरांमध्ये १० सहस्र रुपयांपासून १ लाख रुपये, ‘ब’ वर्ग शहरांसाठी ७ सहस्र ५०० ते ७५ सहस्र रुपये आणि ‘क’ वर्गातील शहरांसाठी ६ सहस्र रुपये ते ६० सहस्र रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.