हिंदूंवरील अत्याचाराला विरोध करण्यासाठी शौर्यजागृती करण्याची आवश्यकता ! – राहुल पाटील, हिंदु जनजागृती समिती

स्वरक्षण प्रशिक्षण

नाशिक – आजच्या काळात हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी शौर्यजागृती करण्याची आवश्यकता आहे, तसेच सर्व हिंदू तरुण-तरुणींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हायला हवे. हिंदूंचे संघटन नसल्यामुळे हिंदूंची हानी होत आहे. त्यामुळेच हिंदूंनी संघटित व्हायला हवे. सर्वांनी देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य करायला पाहिजे. सर्वांनी प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल पाटील यांनी केले, तसेच श्री. पाटील यांनी ‘धर्मशिक्षणाची काय आवश्यकता आहे ?’, हे सांगून समितीच्या धर्मशिक्षणवर्गातही सहभागी होण्याचे आवाहन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने धर्मप्रेमी ऑनलाईनद्वारे जोडलेले होते. या वेळी समितीचे श्री. सतिश लोहारकर यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या सौ. रक्षा कदम यांनी केले.

या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफित दाखवून सर्वांमध्ये शौर्यजागृती करण्यात आली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कु. पूजा काळुंगे यांनी धर्मप्रेमींना स्वरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी उद्युक्त केले. या वेळी अनेकांनी ‘चॅट बॉक्स’च्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही धर्मप्रेमींनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, आम्हाला आजचे व्याख्यान पुष्कळ आवडले. व्याख्यानामुळे शौर्यजागृती झाली आणि अंगावर रोमांच उभे राहिले. तुम्ही असे व्याख्यान नेहमी घेत जा.