पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांनी संतपद गाठल्यानंतर साधकांनी व्यक्त केलेले मनोगत

पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर

१. ‘पू. चपळगावकरकाका हे न्यायाधीश संत होण्याचे पहिले उदाहरण !’ – श्री. नागेश गाडे, संपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह

१ अ. हिंदु राष्ट्राच्या न्यायालयीन लढ्यात सक्रीय सहभाग असणे : ‘पू. सुधाकर चपळगावकरकाका हे निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य आहेत. समाजातील सन्माननीय पदावरून निवृत्त झाल्यानंतर वयाच्या ७५ व्या वर्षीही एका तत्पर कार्यकर्त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या न्यायालयीन लढ्यात त्यांचा सक्रीय सहभाग आहे. नास्तिकतावाद्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ लागू केला गेला. आमच्या दृष्टीने तो ‘श्रद्धा निर्मूलन कायदा’ होता. त्याच्यातील अनेक कलमे काढून टाकणे, हे पू. काकांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले. या विषयाविषयी त्यांनी एका ग्रंथाचे संकलन करून समाजात जागृती निर्माण करण्यास साहाय्य केले आहे. न्यायालयीन कामकाजाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. न्यायालयीन लढ्याविषयी जी सूत्रे आवश्यक असतात किंवा त्यांच्या लक्षात येतात, ती ते लगेचच सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज न्यायालयात सनातनचे अनेक खटले चालू असून त्यात यश मिळत आहे.

श्री. नागेश गाडे

१ आ. आरंभी केवळ न्यायालयीन कार्यात साहाय्य करण्याच्या हेतूने संस्थेशी जोडले जाऊन नंतर साधनेच्या प्रवासास आरंभ होणे : ११ वर्षांपूर्वी ते सनातन संस्थेच्या संपर्कात आले. आरंभी ते केवळ न्यायालयीन कार्यात साहाय्य करण्याच्या हेतूने संस्थेशी जोडले गेले. वर्ष २०१० मध्ये त्यांनी साधना करण्यास आरंभ केला. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून साधनेविषयी जे मार्गदर्शन करतात, ते वाचून त्यांनी त्यांच्या साधना प्रवासास आरंभ केला. त्यांनी वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन घेतले आणि आश्रमात होत असलेल्या भावसत्संगांचा नियमित लाभ घेतला. हळूहळू ते साधनेत पुढेपुढे जात राहिले.

१ इ. ‘भक्तीसह नि:स्वार्थ कर्मयोग केल्याने श्री. सुधाकर चपळगावकर यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली आहे’, असेे प.पू. गुरुदेवांनी सांगणे : न्यायालयातील वातावरण रज-तमयुक्त असल्याने त्या वातावरणात राहून साधना करणे कठीण असते आणि साधना करून नामजपाचा आनंद अनुभवणे, तर अतिशय कठीण असते. ‘भक्तीसह नि:स्वार्थ कर्मयोग केल्याने श्री. सुधाकर चपळगावकर यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली आहे’, असेे प.पू. गुरुदेवांनी सांगितले आहे. वय आणि प्रकृती यांमुळे ते अधिक प्रवास करू शकत नाहीत; परंतु रहात्या ठिकाणाहून ते सतत मार्गदर्शन करत असतात. यांसाठीच सनातनच्या संतांच्या साखळीतील ९७ व्या व्यष्टी संतपदावर ते विराजमान झाले आहेत. स्वत:च्या व्यावहारिक जीवनातील यशासमवेतच मनुष्य जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करत त्यांनी संतपद प्राप्त केले आहे.’

२. कु. प्रियांका लोणे, संभाजीनगर

कु. प्रियांका लोणे

२ अ. शिकण्याची तळमळ आणि जिज्ञासा : ‘पू. चपळगावकर काकांकडून बरीच सूत्रे शिकायला मिळतात. ‘शिकण्याची तळमळ’ आणि ‘जिज्ञासा’ हे गुण पू. काकांमध्ये आहेत. दूरदर्शनवर जी चर्चासत्रे होतात, ती सर्व पू. काका बघतात. त्या चर्चासत्रांचा अभ्यास करून ‘साधक वक्ते कुठेे अल्प पडत आहेत ?’, ते पू. काका सांगतात. पू. काका स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी आश्रमात जाऊन आलेल्या प्रत्येक साधकाला भेटून त्याच्याकडून सतत काहीतरी शिकत असतात. ‘धर्मप्रेमी कशा प्रकारे धर्मकार्य करत आहेत ?’, हे विचारून घेऊन त्यांच्याकडूनसुद्धा पू. काका काही सूत्रे विचारून घेतात. अशा प्रकारे ते सतत शिकत असतात.

२ आ. तत्त्वनिष्ठता आणि समष्टी साधनेची तळमळ : पू. काका शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ आहेत. एकदा एका कार्यक्रमात झालेली चूक त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच उत्तरदायी साधकांना दूरध्वनी करून चूक झाल्याचे कळवले होते. ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी कृती झाली पाहिजे आणि त्यातून सर्वांची साधना झाली पाहिजे’, असा पू. काकांचा विचार असतो. या वयातसुद्धा त्यांची गुरुकार्याची आणि समष्टी साधनेची तळमळ लक्षात येते.

२ इ. धर्मप्रेमींना अडचणीत कायद्याचे साहाय्य उपलब्ध करून देण्याच्या पू. चपळगावकरकाकांच्या तळमळीमुळे धर्मप्रेमींना त्यांच्याविषयी जवळीक वाटणे : संभाजीनगरमध्ये धर्मप्रेमींवर बरेच आघात होत असतात. हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागते. ‘एखाद्या ठिकाणी धर्माविरुद्ध असणारी घटना घडली आहे’, हेे पू. काकांना कळले की, त्या धर्मप्रेमींना कायद्याचे साहाय्य कसे मिळेल ? त्यात काही अडचणी नाहीत ना ? याविषयी ते स्वतः दूरध्वनी करून विचारतात. त्या वेळी हे धर्मप्रमी त्यांच्या ओळखीचे असतातच असे नाही, तरीही धर्मासाठी कार्य करण्याची त्यांची तळमळ असते. जोपर्यंत धर्मप्रेमींच्या अडचणीतून मार्ग निघत नाही, तोपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करतात. त्यामुळे सर्व धर्मप्रेमींना पू. काकांविषयी जवळीक वाटते.

२ ई. रुग्णाईत साधकांची चौकशी करणे : जिल्ह्यातील एखादा साधक रुग्णाईत असल्याचे पू. काकांना कळले, तर ते स्वतः त्या साधकाचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन ‘त्याला काय झाले आहे ? त्याने कोणत्या वैद्याकडे जायला पाहिजे ? तो औषधे कुठून घेतो ?’, याची चौकशी करतात आणि तो साधक जोपर्यंत पूर्णतः ठीक होत नाही, तोपर्यंत त्याचा पाठपुरावासुद्धा करतात. ‘साधक रुग्णाईत झाले, तर त्यांच्या साधनेत खंड पडत असल्याने ते लवकर बरे व्हावेत’, असा त्यांचा विचार असतो. ते प्रत्येक कार्यपद्धतीचे कटाक्षाने पालन करतात.

२ उ. सनातनच्या सर्व साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची तळमळ असणे : गुरुपौर्णिमेच्या वेळी जिल्ह्यातील साधकांचा आध्यात्मिक स्तर सांगितला जातो. एखाद्या साधकाचा आध्यात्मिक स्तर तेवढाच राहिला, तर पू. काका त्याला दूरध्वनी करून त्याची चौकशी करतात. ‘तो साधक कुठेे अल्प पडला ? त्याचा स्तर का वाढला नाही ? पुढील प्रगतीसाठी त्याने काय चिंतन केले आहे ?’, याविषयी त्या साधकाला बोलावून आणि त्याला जवळ बसवून ते प्रेमाने त्याची चौकशी करतात. ‘सनातनच्या सर्व साधकांची प्रगती व्हावी’, असे पू. काकांना नेहमी वाटते.

२ ऊ. प्रत्येक धर्मप्रेमीला हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी जोडण्याचा प्रयत्न करणे : ‘सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी व्यक्ती यांनी धर्माच्या, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी एकत्रित यावे’, असे त्यांना वाटते. त्या दृष्टीने ‘गुरुपौर्णिमा आणि धर्मसभा असतांना एखादा धर्मप्रेमी त्यांना भेटला, तर तो ईश्‍वरी कार्यासाठी जोडला गेला पाहिजे’, असा त्यांचा प्रयत्न असतो. एकदा संपर्क केला आणि नंतर सोडून दिले, असे त्यांच्याकडून होत नाही. त्यांनी सर्वांना आजही जोडून ठेवले आहे.

परात्पर गुरुदेवांची कृपा आहे की, पू. चपळगावकरकाका आणि सद्गुरु जाधवकाका यांचा सत्संग आम्हाला मिळत आहे. बर्‍याच दिवसांपासून आम्ही सर्वजण पू. चपळगावकरकाका संत होण्याच्या आनंददायी वृत्ताची वाट बघत होतो. त्या  आनंदाच्या वार्तेसाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’