समाजात राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

‘सनातन प्रभात’चा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

दीपप्रज्वलन करतांना सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम

फोंडा (गोवा) – उच्च, नीच, धर्म, जाती, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेद नसलेले सर्वसमावेशक असे एक छत म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे आणि तिचे मुखपत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ होय. जसे अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येकाच्या प्राथमिक गरजा आहेत, तसेच राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. हे राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम निर्माण करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय गुरु आणि कुडाळ येथील प्रथितयश वैद्य सुविनय दामले यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीच्या २२ व्या ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

वैद्य सुविनय दामले

यंदा कोरोनाच्या महामारीमुळे ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा ‘ऑनलाईन’ आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. ईशान जोशी यांनी शंखनाद केला. त्यानंतर सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी दीपप्रज्वलन केले. या सोहळ्यात ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे उपसंपादक श्री. चेतन राजहंस, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले.

या वेळी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे दैनिकाचे ध्येय वाक्य साध्य करा’, असे आवाहन त्यांनी या संदेशाच्या माध्यमातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधी कु. सायली डिंगरे यांनी केले.

या वेळी वैद्य दामले पुढे म्हणाले की, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ हे ‘सनातन प्रभात’चे ब्रीद वाक्य सार्थ ठरवण्यासाठी सनातनचे साधक आतापर्यंत घेत असलेले परिश्रम हे धर्मार्थकाममोक्षाणाम् आहेतच; म्हणजे तो एक पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ प्राप्तीचा सोपा मार्ग दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवत आहे. यामुळेच मला असे म्हणावेसे वाटते की, ‘सनातन प्रभात’ ज्यांच्या हाती, धर्मसंस्थापना त्यांच्या हाती’, असे म्हटले, तर काही चुकीचे होणार नाही. ‘सनातन प्रभात’मधून देशाचा इतिहास, भूगोल शिकवण्यासह देशभक्त आणि क्रांतीकारक यांचीही माहिती दिली जाते. यासह आयुर्वेदाचेही पुनरुत्थान करण्याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचा आदर करून स्वतःचेे जीवन राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी व्यतीत केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना नक्कीच होणार आहे.’

विशेष

‘सनातन प्रभात’च्या ‘यू ट्यूब चॅनल’, ‘सनातन प्रभात’चे संकेतस्थळ आणि ‘ट्विटर’ आदींच्या माध्यमातून कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. या ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन कार्यक्रमाला ‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि वितरक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

इस्रायलसारखी राष्ट्रनिष्ठा निर्माण करून आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी मार्गक्रमण करावे लागेल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट

इस्रायल हा छोटासा देश;  मात्र चारही बाजूने असलेल्या इस्लामी राष्ट्रांना पुरून उरतो. त्याचे कारण इस्रायलमधील प्रत्येक नागरिकात असलेली राष्ट्रनिष्ठा होय. अशाच राष्ट्रनिष्ठेच्या आधारे आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी मार्गक्रमण करावे लागेल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.

या वेळी श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘सनातन प्रभात नियतकालिकांनी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, वाचक, धर्मनिष्ठ यांच्यामध्ये ईश्‍वरनिष्ठा, सत्यनिष्ठा, धर्माविषयीची ओढ निर्माण केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २२ वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून ‘सनातन प्रभात’ सर्वांसमोर आणले. ‘सनातन प्रभात’मधील परखड लिखाण आणि योग्य दृष्टीकोन यांमुळे धर्मप्रेमींना योग्य दिशा मिळाली. आज अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जात आहे आणि हिंदूंवर टीका केली जात आहे. बुद्धीवाद्यांकडून समाजात  द्विधास्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराविषयी ‘सेक्युलर’ लोक गप्प राहिले; मात्र सनातन प्रभातने याच्या विरोधात आवाज उठवला. कोरोनाच्या काळात हिंदुत्वनिष्ठ नि:स्वार्थीपणे काम करत असतांना परिस्थितीचा अपलाभ उठवत धर्मांतर करण्याचे काम ख्रिस्ती मिशनर्‍यांनी केले. पंजाबमध्ये मुस्लीमबहुल भागाला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा दिला गेला; मग बहुसंख्य असलेल्या भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जाऊ नये ? असा प्रश्‍न आहे. अशा अनेक हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आवाज उठवून सर्वांमध्ये धर्म आणि राष्ट्र निष्ठा निर्माण करण्याचे काम सनातन प्रभात करत आहे. अशा सनातन प्रभातचे वाचक व्हा. इतरांनाही वाचक बनवा. सर्वांमध्ये जागृती निर्माण करा आणि हिंदु राष्ट्राच्या कार्यात तन, मन, धन आणि स्वत:तील कौशल्याचे योगदान द्या !

‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक, हितचिंतक साधक होणे, हे एक ऐतिहासिक कार्य ! –  चेतन राजहंस, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’

श्री. चेतन राजहंस

‘सनातन प्रभात’विषयीचे वाचकांचे विचार ऐकले की, ज्या ध्येयाने ‘सनातन प्रभात’ चालू झाले, त्या ध्येयाने वाटचाल चालू आहे, याची निश्‍चिती वाटते. ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि सनातन यांच्यामध्ये कुटुंबभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘सनातन प्रभात’वर आलेल्या अनेक संकटांच्या वेळी वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते यांनी कुटुंबभावनेने साहाय्य केले. ‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक, हितचिंतक आता साधक झाले आहेत, हे एक ऐतिहासिक कार्य सनातनने केले, असे आम्ही मानतो. कोरोनाच्या काळाला आध्यात्मिक स्तरावर कसे सामोरे जावे, याचे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’मधून करण्यात येते. आगामी आपत्काळाला, तिसर्‍या महायुद्धामुळे निर्माण होणार्‍या स्थितीला सामोरे कसे जायचे ? याचे सविस्तर मार्गदर्शन करून ‘सनातन प्रभात’ समाजाला सिद्ध करत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील बातम्या आता ‘डेली हंट’ या ‘न्यूज अ‍ॅप’वर प्रसिद्ध होत आहेत. आता टेलीग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींच्या माध्यमातूनही कार्य चालू  आहे. आगामी काळात हिंदु राष्ट्राचा विचार कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून कार्य चालू राहील. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्न करा. विविध सामाजिक प्रसारमाध्यमांतूनही सनातन प्रभातचा प्रसार करा.