वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार ह.भ.प. भानुदास यादव महाराज यांचा देहत्याग !

ह.भ.प. भानुदास यादव महाराज

कोल्हापूर, १९ मे (वार्ता.) – येथील वारकरी संप्रदायातील प्रमुख आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे ह.भ.प. भानुदास यादव (वय ६५ वर्षे) महाराज यांनी १९ मे या दिवशी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ ह.भ.प. महादेव तथा बंडा महाराज, भावजय, दोन पुतणे असा परिवार आहे. ह.भ.प. यादव यांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रति विशेष स्नेह होता. २ डिसेंबर २००१ या दिवशी कोल्हापूर येथील सर्वसंप्रदाय सत्संगात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत एक वक्ता म्हणून ते सहभागी झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात झालेले आंदोलन असो अथवा हिंदु धर्मावर होणारा आघात-विडंबन असो वा समितीच्या वतीने होणारे आंदोलन असो, त्यांचा सक्रीय सहभाग असे. सनातनच्या वतीने होणार्‍या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यासाठी ते वक्ता म्हणून उपस्थित असत. समितीच्या उपक्रमांसाठी ते मठाची जागा उपलब्ध करून देत.

वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र महाराज यादव यांचे ते सुपुत्र होत. त्यांच्या पश्‍चात त्यांनी कोल्हापूर आणि पंढरपूर या मठांचे उत्तराधिकारी म्हणून पारमार्थिक परंपरा जतन केली होती. गुरुवर्य साखरे महाराज संपादित सार्थ ज्ञानेश्‍वरी, विचार सागर, सार्थ अमृतानुभव, सार्थ चांगदेव पासष्टी यांसारख्या ग्रंथांचे त्यांनी पुनःसंपादन आणि प्रकाशन केले होते. कीर्तन, भजन आणि प्रवचन या माध्यमांतून त्यांनी सातत्याने समाजप्रबोधन केले. ‘करवीर काशी फाऊंडेशन’चे प्रमुख सल्लागार म्हणून २० वर्षे ते सांस्कृतिक-सामाजिक चळवळीत सहभागी होते. वारकरी साहित्य परिषदेचा ‘जीवन गौरव पुरस्कार’, ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते ‘वारकरी जीवन पुरस्कार’, स्वामी अमलानंद भक्त मंडळाच्या वतीने ‘स्वामी अमलानंद सेवा पुरस्कार’ यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वारकरी दिंडींचे ते मार्गदर्शक होते.

काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ह.भ.प. यादव महाराज यांच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी, ‘ह.भ.प. यादव महाराज यांच्याकडे पाहिल्यावर आपुलकी-जिव्हाळा जाणवतो’, असे गौरवोद्गार काढले होते.