भारतातील समृद्ध वास्तूकला !

भारतात केवळ घरेच नव्हे, तर मंदिरे, राजवाडे, किल्ले हे वास्तूशास्त्राचा उपयोग करून बांधले जात. हे शास्त्र एवढे प्रगत होते की, त्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आवश्यकतेनुसार केलेली असायची. कालौघातात ते नष्ट झाले किंवा शत्रूकडून नष्ट करण्यात आले. तरी त्यातील काही वास्तू अद्यापही तग धरून आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षा व्यवस्था असलेला गोवळकोंडा येथील किल्ला !

गोवळकोंडा किल्ला

‘मी एका किल्ल्यातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशास्त्राच्या संदर्भात आलेला एक अनुभव सांगतो. हैद्राबाद येथे गोवळकोंडा भागात एक किल्ला आहे. तेथे पूर्वी राजा रहात होता. किल्ल्याभोवती ४ – ५ संरक्षक भिंती आहेत. त्या फार उंच आहेत. शत्रूने आक्रमण केल्यावर त्यातील २ – ३ भिंती तोडल्या, तरी किल्ला सुरक्षितच रहात असे. शेवटी चौथ्या भिंतीच्या आत शत्रूने हळूच पाय ठेवला, तरी त्या भिंतीच्या सर्वांत वरच्या बाजूला धडधड असा नाद येत असे. त्यामुळे शत्रू किती जवळ आला आहे, याचा राजाला अंदाज घेता येऊन अन्य सुरक्षित ठिकाणी जाणे किंवा आक्रमण करणे यांविषयी निर्णय घेता येत असे.’ – श्री. विनोद यादव, वैशाली, बिहार

वेळेचा अंदाज देणारी कोणार्कच्या सूर्य मंदिराची चाके !

कोणार्क सूर्य मंदिराचे चाक

कोणार्कचे सूर्य मंदिर ओडिशातील मध्ययुगीन वास्तूकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. एक विशाल रथासारखे प्रतित होणारे कोणार्कच्या सूर्य मंदिराला चाकांच्या १२ जोडया लागलेल्या आहेत. या भव्य रथाला ७ धष्टपुष्ट घोडे ओढत असल्याचे दिसते. रथाला लावलेली ही चाके घडयाळाचेसुद्धा कार्य करतात. ही चाकं साधारण नसून योग्य वेळ दाखवणारी घडयाळे आहेत. या चाकांच्या पडणार्‍या सावलीवरून कुणालाही किती वाजलेत याचा अचूक अंदाज लक्षात येतो.

उपग्रहाच्या ‘रेंज’मध्ये येऊ न शकणारे स्थळ – शिवथरघळ !

शिवथरघळ

‘नेटवर्क’ असूनही शिवथरघळ येथून भ्रमणभाष करता येत नाही. ‘सिग्नल’ मिळूनही भ्रमणभाष का करता येत नाही ?’, यावर एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय शास्त्रज्ञाने एक आठवडा शिवथरघळ येथे राहून संशोधन करून लेख लिहिला आहे. तो पुढे थोडक्यात दिला आहे.

‘शिवथरघळ येथील मोकळ्या आकाशाखाली जर्मन, चिनी, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची ‘रेंज’ येईना. हा चमत्कारच होता. उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते; पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते, म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते, जे उपग्रहांच्या ‘फ्रिक्वेन्सिज्’खाली पोचू देत नव्हते. ते यंत्र हाताळणारी व्यक्ती म्हणाली, ‘‘मी पूर्ण जग फिरलो, परंतु जराही ‘फ्रिक्वेन्सी’ नसलेली अशी केवळ हीच एक जागा पाहिली.’’ ‘समर्थ रामदासस्वामी यांनी किती सूक्ष्म स्तरावर अभ्यास करून ही जागा निवडली आहे !’, याची प्रचीती येते. (सौजन्य : सोशल मीडिया)

किरणोत्सव होऊ शकेल अशी श्री महालक्ष्मी मंदिराची रचना !

महालक्ष्मी मंदिर

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात प्रतिवर्षी २ वेळा किरणोत्सव होतो. मंदिराची उभारणी करतांना पृथ्वीच्या गतीचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आलेला आहे. सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा अचूक अभ्यास केलेला आहे. सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण प्रारंभाच्या वेळी होणारा किरणोत्सव हा पुरातन काळातील प्रगत स्थापत्य आणि खगोल शास्त्राचा एक अभूतपूर्व असा सुरेख संगमच आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गरूड मंडपापासून गर्भगृहात १८५ मीटर आत असणार्‍या महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर सूर्यास्ताची किरणे पडतात. या किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्ताची किरणे देवीच्या पायापर्यंत, दुसर्‍या दिवशी मध्यापर्यंत आणि तिसर्‍या दिवशी पूर्ण मूर्तीवर विराजमान होतात.

आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असलेले आणि सहस्र वर्षांपेक्षा जुनी परंपरा असलेले ‘आयुरगृह’, म्हणजे आयुर्वेदीय घर !

आयुरगृह

‘मनुष्याचे आयुष्य काही वर्षांचे असते, तर देवता चिरंतन आहेत. त्यामुळे भारतात प्राचीन काळापासून मनुष्यासाठी काही दशके वा शतके टिकू शकतील अशी मातीची घरे बनवण्यात येत असत, तर देवतांच्या मूर्तींची स्थापना सहस्रो वर्षे टिकू शकणार्‍या दगडी मंदिरांमध्ये केली जात असे. मातीची घरे बनवतांनाही आयुर्वेद, वास्तूशास्त्र आदी शास्त्रांत दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात असे. अशा घरांना केरळमध्ये ‘आयुरगृह’ म्हणतात. घरे बनवण्यासाठी वापरायच्या मातीमध्ये काही वनस्पतींचा वापर केला जात असे. ही घरे आरोग्यासाठी पूरक असल्याने त्यांना ‘आयुरगृह’ म्हणतात.