|
सिंधुदुर्ग – कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन लहान मुलांसाठी ५० खाटांचे ‘कोविड केअर सेंटर’ चालू करण्यात येणार असून ते तातडीने चालू होण्यासाठी कार्यवाही करावी, असा आदेश जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्लाझ्मा थेरपी यंत्रासाठी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पुढील लाटेचा धोका लक्षात घेता लहान मुलांसाठी ‘कोविड केअर सेंटर’ उभारण्याचे प्रयत्न चालू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी भरती होणार्या मुलांना चांगल्या पद्धतीने, घरच्यासारखी वागणूक दिली जाईल. यासाठी जिल्ह्यातील खासगी बालरोगतज्ञांशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन न्यून पडू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक अमित सैनी यांच्याशी समन्वय साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ६६४ रुग्ण : १५ जणांचा मृत्यू
उपचार चालू असलेले रुग्ण ५ सहस्र ५३७
बरे झालेले एकूण रुग्ण १२ सहस्र २६१
मृत्यू झालेले एकूण रुग्ण ४३५
आतापर्यंतचे एकूण रुग्ण १८ सहस्र २३९