कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी रुग्णालयांनी सज्ज रहाण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, १२ मे – कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेनंतर आता तिसर्‍या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये बालकांसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा, उपाययोजना गतीने निर्माण कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. तसेच सर्व प्रकारच्या तज्ञ आधुनिक वैद्यांनी कोरोनाच्या काळात सेवा द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
ते पुण्यातील ‘कौन्सिल हॉल’ येथे ‘कोरोना केअर कमिटी’च्या बैठकीत बोलत होते. त्या वेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयाचे अधिष्ठाता उपस्थित होते.

भारती रुग्णालयाचे डॉ. संजय ललवाणी म्हणाले की, लहान मुलांसाठी विशेष कक्ष निर्माण करावा लागेल. तसेच बालकांसमवेत येणार्‍या मातांसाठी वेगळा कक्ष निर्माण करावा लागेल.