पुणे येथे लसीकरण केंद्रावर वशिला असणार्‍यांची घुसखोरी !

सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन कसे होईल ? याकडे लक्ष दिले पाहिजे. घुसखोरी करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी, तरच सामान्य लोकांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा होईल !

पुणे – लसीकरण केंद्रावर नगरसेवक, आमदार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, तसेच संस्था-संघटन यांचे कार्यकर्ते घुसखोरी करत आहेत. नोंदणी नसतांनाही ते आपल्या मर्जीतील लोकांचे लसीकरण करून घेत असल्याचा अपप्रकार समोर आला आहे.

सध्या आवश्यक त्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रावरील ३०० ते ४०० लोकांपैकी केवळ १०० जणांनाच लस मिळत असल्याने केंद्रावर गोंधळ होत आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी अ‍ॅपवरून लसीकरण केंद्र आणि वेळेची नोंदणी निश्‍चित केलेल्यांनाच लस मिळणार असल्याचे सांगितले असतांनाही हा प्रकार चालू आहे.

या प्रकारासंदर्भात ‘नियमांचे पालन करून लसीकरण केले पाहिजे. तसे न झाल्यास संबंधितांची चौकशी केली जाईल’, असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.