पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथे दोन डॉक्टरांनी पुढाकार घेत रुग्णांच्या सोयीसाठी केवळ कोरोना रुग्णांसाठी ५० खाटांचे विठ्ठल रुक्मिणी कोरोना सेंटर चालू केले आहे. या रुग्णालयामुळे रुग्णांना ऑक्सिजन खाटा मिळणे सुलभ होणार आहे. येथील डॉ. पंकज गायकवाड आणि डॉ. अमित गुंडेवार यांनी नगरपालिकेच्या ६५ एकर क्षेत्रावरील भक्तीसागर येथील इमारतीमध्ये हे हेल्थ सेंटर चालू केले असून ८ मे या दिवशी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
या ठिकाणी ‘बेंझ सर्किट मास्क’चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन मिळून व्यय होणार्या जवळपास ५० टक्के ऑक्सिजनची बचत होणार असल्याचे डॉ. पंकज गायकवाड यांनी सांगितले. या ठिकाणी रुग्णांसाठी ‘थ्री टियर’ पद्धतीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी आणखी ५० खाटा वाढवण्याची सिद्धताही डॉ. पंकज गायकवाड आणि डॉ. गुंडेवार यांनी केली आहे.
पंढरपूर येथे बालकांसाठी कोरोना रुग्णालय
नवजात शिशूंसह बालकांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यासाठी येथील डॉ. शीतल शहा यांनी स्वतंत्र कोरोना रुग्णालय चालू केले आहे. त्यांच्या नवजीवन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यासाठी स्वतंत्र कोरोना उपचारासाठी १५ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यातील ५ खाटांसाठी व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध केली आहे.