वर्धा – येथील सेवाग्रामस्थित महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील ‘जेनेटिक लाइफ सायन्सेस’ आस्थापनात ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चे उत्पादन चालू झाले असून ही आनंदाची गोष्ट आहे. या औषधासाठी अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चे उत्पादन चालू झाल्याने काळाबाजार थांबेल. गरिबांना सरकारी शुल्कात इंजेक्शन उपलब्ध होईल. ‘जेनेटिक लाइफ’ हे अतिशय अल्प वेळात भारत शासनाची अनुमती मिळणारे देशातील पहिले आस्थापन आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ६ मे या दिवशी येथे केले. या आस्थापनात प्रतिदिन ३० सहस्र व्हायलची निर्मिती होणार आहे. नितीन गडकरी यांनी अल्पावधीत रेमडेसिविर इंजेक्शन उत्पादनास अनुमती मिळवून दिली. ६ मे या दिवशी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या आस्थापनात उत्पादनाची पहाणी करत आढावा घेतला.
गडकरी म्हणाले की, उत्पादित झालेल्या रेमडेसिविरचे वितरण जिल्हाधिकार्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत प्रथम करावे. त्यानंतर राज्यात ते सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. मग देशात इतरही ठिकाणी दिले जाईल. सर्व काही आम्हालाच मिळाले पाहिजे, असा आग्रह नाही; मात्र वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल. गरिबांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल.