‘हिरण्याक्ष नामक असुराने पृथ्वीला पळवून महासागरात लपवून ठेवले असता श्रीविष्णूने वराह अवतार घेऊन पृथ्वीचे रक्षण केले. सृष्टीचे संतुलन सदैव टिकून रहाण्यासाठी भगवान शिव अखंड ध्यानावस्थेत रहातो. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हेही अनेक दैवी गुणांनी युक्त असून ते देवतासमान असल्याच्या अनेक अनुभूती साधकांना आल्या आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनाही देवतांप्रमाणे अखिल मानवजातीच्या रक्षणाची आणि कल्याणाची, तसेच सृष्टीचीही काळजी आहे.
आपत्काळाच्या पूर्वसिद्धतेविषयी ‘सनातन प्रभात’मधून जागृती
आपत्काळात अन्न-धान्य, पाणी, इंधन, वीज यांसारख्या अनेक जीवनावश्यक गोष्टींची मानवाला नितांत आवश्यकता असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक स्तरावर; इतकेच नव्हे, तर मानसिक, कौटुंबिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही पूर्वसिद्धता करणे आवश्यक असते. या दृष्टीने ‘प्रत्येकाने व्यक्तीगतरित्या, तसेच समाजबांधवांनी एकत्रितपणे मिळून काय करायला हवे’, हे सांगणारे परात्पर गुरु डॉक्टर हे एकमेवच होत. त्यांनी ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची सिद्धता’ या विषयावरील लेख नियतकालिके अन् संकेतस्थळे यांवर प्रसिद्ध केले असून याविषयीची ग्रंथमालिकाही प्रसिद्ध होत आहे.
– (पू.) श्री. संदीप आळशी
विविध उपचारपद्धतींविषयीच्या माहितीचा पूर्वीपासून संग्रह करून आपत्काळात साधकांना उपयुक्त व्हावे, यासाठी ग्रंथ सिद्ध करणे
भावी आपत्काळात पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि महायुद्धासारख्या मानव-निर्मित आपत्ती येणार आहेत. अखिल मानवाला या आपत्तींना समर्थपणे तोंड देता येण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१३ पासून ‘आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेच्या निर्मितीला आरंभ केला. यामध्ये डॉक्टर, औषधे आदी नसतांना स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील, अशा विविध उपचारपद्धतींवरील ग्रंथ आहेत. या अंतर्गत ‘प्राणशक्तीवहन उपाय’ आणि ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ या सोप्या आणि प्रभावी उपचारपद्धतींचा शोध परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः लावला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष १९८० पासूनच मुंबई येथील त्यांच्या घरी रहात असतांनाच्या काळात आयुर्वेद, बिंदूदाबन, रेकी यांसारख्या उपचारपद्धतींविषयीची शेकडो कात्रणे संग्रहित करून ठेवली होती. या कात्रणांचा उपयोगही आता ग्रंथ बनवण्यासाठी होत आहे. यातूनही परात्पर गुरु डॉक्टरांचे द्रष्टेपण विदित होते. भावी आपत्काळात घरगुती औषधे सहजतेने उपलब्ध व्हावीत, यासाठी देश-विदेशांतील मानवांना त्यांच्या घराच्या आगाशीत, अंगणात अथवा घराजवळच्या परिसरात सहजतेने लागवड करता येतील अशा औषधी वनस्पतींचा अभ्यास ते साधकांकडून करवून घेत असून या वनस्पती सर्वत्र लावल्या जाव्यात याकडे लक्षही देत आहेत. त्यांनी औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयीचे ग्रंथही सिद्ध करवून घेतले आहेत.
महाभीषण आपत्तींत देवाचे साहाय्य होण्यासाठी साधनेचे महत्त्व सांगणेआपत्काळात रक्षण होण्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या बळावर कितीही सिद्धता केली, तरी भूकंप, त्सुनामी यांसारख्या महाभीषण आपत्तींतून वाचण्यासाठी शेवटी सारा भरवसा देवावरच ठेवावा लागतो. व्यक्तीने साधना करून देवाची कृपा प्राप्त केली, तर देव व्यक्तीचे कोणत्याही संकटात रक्षण करतोच. भक्त प्रल्हाद, पांडव यांसारख्या अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झाले आहे. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टर काही वर्षांपासून अखिल मानवाला कळकळीने सांगत आहेत, ‘आता जिवंत रहाण्यासाठी तरी साधना करा !’
‘धर्माचरणाचा र्हास होऊन अधर्म बळावला की, पृथ्वीवर संकटे येतात’, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. समाज धर्माचरणी आणि साधक बनला, तसेच सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात धर्माचे अधिष्ठान असले की, पृथ्वीवर संकटे येत नाहीत आणि सृष्टीचे संतुलन स्थिर रहाण्यासही साहाय्य होते. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टर केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर धर्माचे अधिष्ठान असलेले ‘ईश्वरी राज्य’ स्थापन करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करत असून त्यासाठी संत, संप्रदाय, साधक, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि राष्ट्रभक्त यांचे संघटनही करत आहेत. ’
– (पू.) श्री. संदीप आळशी (११.११.२०१९)
गेल्या काही वर्षांपासून परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती अत्यंत न्यून असून, म्हणजे जेमतेम जिवंत रहाण्याइतपतच असून ते अनेक व्याधींनी ग्रसित आहेत. ते स्वतः ब्रह्मलीन अवस्थेत असून मनात आणले, तर कधीही सानंद देहत्याग करू शकतात. असे असतांनाही ते केवळ अखिल मानवाचे आपत्काळापासून रक्षण व्हावे आणि अखिल मानवजात सात्त्विक बनून सर्वत्र ईश्वरी राज्य यावे अन् सकल सृष्टीचे कल्याण व्हावे, यांसाठी प्रतिदिन अक्षरशः देहातील प्राण एकवटून कार्यरत असतात !
अशा धर्मसंस्थापक, जगतोद्धारक, सृष्टीचे पालनहार आणि युगप्रवर्तक परम कृपाळू गुरुमाऊलीच्या चरणी शिरसाष्टांग नमन !
– (पू.) श्री. संदीप आळशी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चिरंतन विचार !
‘तिसर्या महायुद्धात एखादा देश जिंकावा किंवा एखाद्या देशाची हानी होऊ नये’, असा विचार माझ्या मनात येत नाही, तर ‘सात्त्विक व्यक्ती जिवंत राहाव्यात’, एवढाच विचार येतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘चराचरातील प्रत्येक गोष्टीला ‘उत्पत्ती-स्थिती-लय’ हा नियम लागू असतो. भौगोलिक सीमांनी बद्ध असलेले राष्ट्रही याला अपवाद नसल्याने कधीतरी राष्ट्र नाश पावतेच. याउलट मनुष्याने वर्तमान जन्मी साधना केली, तर त्या साधनेचे फळ त्याला जन्मोजन्मी मिळते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे अखिल मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे ‘मोक्षगुरु’ आहेत. मनुष्याचे खरे कल्याण त्याला ईश्वरप्राप्ती होण्यातच आहे. त्यामुळे भावी तिसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनात भौगोलिक सीमांनी बद्ध असलेल्या एखाद्या राष्ट्राच्या संदर्भात विचार न येता ‘सात्त्विक व्यक्तींना ईश्वरप्राप्ती करून घेता येण्यासाठी त्या जिवंत रहाव्यात’, हा विचार येतो. असे असले, तरी राष्ट्राप्रतीचे कर्तव्य आणि कृतज्ञतेची भावना म्हणून ते भारताच्या सर्वंकष कल्याणासाठी अविरत कार्यरत आहेतच.’
– (पू.) श्री. संदीप आळशी
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |