इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४० ठार

शेकडो जण घायाळ

तेल अवीव (इस्रायल) – येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केल्यानंतर या कार्यक्रमासाठी १० सहस्रांहून अधिक जणांनी उपस्थिती दर्शवली होती. घटना घडली, ती जागा ज्यू धर्मियांसाठी जगातील सर्वांत पवित्र स्थळांपैकी एक असून ते एक तीर्थस्थळ आहे. दुसर्‍या शतकातील संत रब्बी शिमोन बार योचाई यांचे या ठिकाणी समाधीस्थळ आहे. उत्सवाच्या वेळी रात्रभर प्रार्थना आणि नृत्य सादर केले जात होते. येथील माउंट मेरेन स्टेडिअममध्ये आसन व्यवस्था कोसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.