कोरोनामय आयपीएल् !

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने भारतात थैमान घातले आहे. प्रतिदिन जवळपास ३ सहस्र भारतीय जीव गमावत आहेत, तर ३ लाखांहून अधिक लोक कोरोना ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) असल्याची भयावह आकडेवारी समोर येत आहे. ‘कोरोना अ‍ॅक्टिव्ह केसेस’ची (संसर्ग झाल्याची प्रकरणे) जागतिक आकडेवारी पाहिल्यास यापैकी तब्बल १५ टक्के रुग्ण हे भारतीय आहेत. ऑक्सिजनचा भेडसावणारा तुटवडा, ‘रेमडेसिर’ औषध मिळण्यात येणार्‍या असंख्य अडचणी, अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने अपुरी पडत असलेली भारतीय आरोग्य व्यवस्था आदींमुळे सर्वत्र हळहळ पसरली आहे.

‘पॅट’ आणि ‘ब्रेट’ यांचे साहाय्य !

देशातील आरोग्ययंत्रणा या महामारीशी सामना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असतांना ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स आणि माजी गोलंदाज ब्रेट ली यांनी भारताच्या या कोविडविरोधी युद्धास हातभार लावला आहे. त्यांनी अनुक्रमे ३७ लाख आणि ४३ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. यासंदर्भात ट्वीट करतांना कमिन्स म्हणाले, ‘‘भारतावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या स्थितीने मी व्यथित झालो आहे. भारतीय रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा, यासाठी मी ५० सहस्र डॉलर्स (३७ लाख भारतीय रुपये) साहाय्य करत आहे. भारतियांचा स्नेह अनुभवलेल्या ‘आयपीएल्’मधील खेळाडूंना मी आवाहन करतो की, त्यांनीसुद्धा पुढे येऊन भारतास साहाय्य करावे.’’ ली यांनी तर भारताचा ‘माझे दुसरे घर’ असा गौरव केला आहे. असे असतांना भारतीय खेळाडू मात्र ‘आयपीएल्’ खेळण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक दिग्गज खेळाडूला कोट्यवधी रुपये देणार्‍या या स्पर्धेने अंध बनवले आहे कि काय ? असा प्रश्‍न त्यामुळे निर्माण होतो. गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये अनेक आजी आणि माजी भारतीय खेळाडूंनी कोरोनाशी लढण्यासाठी निश्‍चितच साहाय्य केले होते; परंतु आज खर्‍या अर्थाने त्यांच्याकडून साहाय्याची अपेक्षा होत असतांना ते स्वत:कडे खोर्‍याने पैसे ओढण्यातच मग्न आहेत. काही दिवसांनी यातील काही खेळाडू ‘विराट’ स्वरूपात साहाय्य घोषित करतीलही; परंतु येथे प्रश्‍न केवळ साहाय्य करण्यापुरताच मर्यादित नाही.

सामाजिक भानाचा तुटवडा !

कुटुंबची कुटुंबे मृत्यूमुखी पडत असतांना भारतात आयपीएल्चे आयोजन होणे, हेच मुळात नैतिकतेच्या स्तरावर कितपत योग्य आहे ? हा प्रश्‍न उद्भवतो. प्रतिवर्षी एप्रिल-मे मध्ये आयोजित केली जाणारी आयपीएल् स्पर्धा गतवर्षी ओढवलेल्या कोरोना महामारीमुळेच पुढे ढकलून सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत पार पडली. यानंतर म्हणजे अवघ्या ५ मासांनी या स्पर्धेचे आयोजन करणे कितपत आवश्यक होते, याचा विचार आयोजक आणि सरकारी यंत्रणा यांच्याकडून झाला का ? बरं, असेही नाही की, एप्रिलच्या आरंभी भारतात सर्वत्र आलबेल होते. तेव्हापासूनच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्‍यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्‍यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ज्या प्रकारे लोक मरत आहेत, त्या प्रकारे जनतेप्रती आपले दायित्व, तिच्या दु:खाविषयी संवेदनशीलता आदी गोष्टींच्या आयोजक अन् सरकारी व्यवस्था यांच्याठायी असलेल्या तुटवड्यामुळेच आपले सामाजिक भान हरपले आहे का ? असा प्रश्‍न निर्माण होतो. ‘रोम जळत असतांना निरो फिडेल वाजवत असल्या’चाच हा प्रकार होय. असो.

आर्थिक गणित !

सामाजिक भानाचा अभाव हेच या स्पर्धेच्या आयोजनामागील एकमेव कारण आहे, असे नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून होत असलेल्या आर्थिक उलाढालीची आणि शक्य त्या सर्व मार्गांनी पैसा कमावण्याची ही नामी संधी कुणाला गमवायची नाही. ‘मॅच फिक्सिंग’चे अनेक आरोप झाल्यामुळे आणि त्यातील काही सिद्ध झाल्याने आयपीएल् या १४ वर्षे जुन्या स्पर्धेला अनेक वेळा गालबोट लागलेले आहे. काही संघांवर २ वर्षांचा प्रतिबंध लावण्यापर्यंतची नामुष्की ओढवल्याचेही आपण पाहिले आहे. वर्ष २०१७ मध्ये ‘दि इन्साईड एज’ नावाची वेब सीरिज प्रसारित झाली होती. त्यामध्ये आयपीएल्सारख्या ‘कॅश रिच’ स्पर्धांमध्ये खेळाडूंना कशा प्रकारे अनधिकृतरित्या पैसे देऊन खराब खेळण्यास उद्युक्त केले जाते, हे दाखवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर यात संघांचे मालकच खेळाडूंना अमुक पद्धतीने खेळण्यास उद्युक्त करतात, याचे चित्रण करण्यात आले आहे. ‘एखाद्या संघाचा पराभव झाला, तरी आर्थिक जगतामध्ये तो संघच विजयी झालेला असतो’, असा स्पष्ट संदेश या वेब सीरिजमधून देण्यात आला. सीरिजच्या दिग्दर्शकाने तर ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष, तसेच केंद्रीय मंत्री यांचेही यात आर्थिक साटेलोटे असल्याचे किंबहुना तेच या सर्व गौडबंगालाचे बोलवते धनी असल्याचे दाखवले. प्रत्यक्षात असे नसेल, अशी आपण अपेक्षा करूया; परंतु काही सामने हे ‘फिक्स’ असतात, असे म्हणण्यास मात्र वाव रहातो. एक वेळ आपण असेही गृहीत धरू की, आयपीएल्चे सर्व सामने हे पारदर्शकपणे खेळले जात असतील. तरी त्यातून अधिकृत होत असलेला आर्थिक लाभ हा शेकडो नव्हे, तर सहस्रो कोटी रुपयांच्या घरात जातो, हे विसरून कसे चालेल ?

आता प्रश्‍न उरतो की, कोणत्याही राजकीय पक्षाने आयपीएल्च्या आयोजनास विरोध का केला नाही ? बंगाल, केरळ आदी राज्यांत चालू असणार्‍या निवडणुकांच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांकडून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व नियमांना धाब्यावर बसवत प्रचारसभा घेतल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्याकडून आयपीएल्च्या आयोजनावर प्रतिबंध घालण्याची अपेक्षा करणे फोल आहे, असे म्हणता येईल. ‘शेकडो कोटी रुपये व्यय करून निवडणुका घ्याव्या लागतात, त्यामुळे त्याची प्रक्रिया मध्येच कशी थांबवणार’, अशा प्रकारे एखादा उपटसुंभ आपले ज्ञान पाजळेल. खरेतर राजकीय इच्छाशक्ती असती, तर ‘ऑनलाईन प्रचारसभा’ घेण्याचा पर्याय अवलंबून जनतेच्या जीविताचा विचार निश्‍चित करता आला असता; पण तोही झाला नाही. राजकारण्यांनी तर समाजासमोर आदर्श निर्माण करणे अपेक्षित असते; परंतु त्याच्या अगदी उलट स्थिती किमान निवडणुकांचे सूत्र हाताळण्याच्या अनुषंगाने दिसून येते. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या देशातील ही स्थिती संपूर्ण व्यवस्थेलाच अंतर्मुख करायला लावणारी आहे. राममंदिर केवळ स्थुलातून उभारणे आवश्यक नसून ते प्रत्येक भारतियाच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. तर आणि तरच आपल्या प्रत्येकात सामाजिक भान, दायित्वाचे गांभीर्य, व्यापकत्व आदी दैवी गुणांचा संचार होऊ शकेल, हे लक्षात घेऊया.