गोव्यातील कोरोनाविषयक निर्बंधांची कडक कार्यवाही करण्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकार्‍यांना सूचना

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २७ एप्रिल (वार्ता.)-  गोव्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कोरोनाविषयक निर्बंधांचे पालन करणे, तसेच १४४ कलम आणि रात्रीची संचारबंदी यांचे पालन होण्यासाठी कडक कार्यवाही करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत पोलिसांना पूर्णपणे मुभा दिली आहे. विवाह समारंभ, क्रीडा प्रकार, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम, तसेच जत्रा या ठिकाणी पोलिसांना देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीत नियमांचे उल्लंघन करण्यार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी रात्री संचारबंदीच्या वेळी आणि दिवसा पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘पोलिसांनी विवाह समारंभाच्या ठिकाणी भेट देऊन तिथे किती लोक उपस्थित आहेत, हे पडताळून पहावे. त्या ठिकाणी ५० हून अधिक लोक असल्यास त्यांना तेथून बाहेर काढण्यात यावे. जर कुणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी.’’ त्याचप्रमाणे २६ एप्रिलला नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा विजयोत्सव साजरा करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचाही अहवाल मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून मागवला आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून सूचना केल्या.