यवतमाळ, २४ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्याचे नवे पालकमंत्री संदीपानराव भुमरे यांना ‘आम्ही यवतमाळकर’ संस्थेच्या वतीने कोरोना महामारी आणि जिल्ह्यातील विविध समस्या यांविषयी २१ एप्रिल या शासकीय विश्रामगृह येथे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी उपस्थित होत्या. खासगी आणि शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय, पाणीटंचाई, खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन, कोरोना काळातील वीजदेयक रहित करावे, शेतमालाला योग्य भाव द्यावा, जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्याची चौकशी करावी इत्यादी समस्या निवेदनात मांडण्यात आल्या. या निवेदनाची पालकमंत्र्यांनी नोंद घेऊन निश्चितच योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले. निवेदन देतांना ‘आम्ही यवतमाळकर’ संस्थेचे संयोजक अमित मिश्रा, कोअर कमेटी सदस्य विजय कुमार बुंदेला, युवा कार्यकर्ते आकाश सिंघानिया, सुधीर कैपिल्यवार उपस्थित होते.