परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्यासंदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. जन्मोत्सव सोहळा आरंभ झाल्यावर आलेल्या अनुभूती

अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना बघून मला साक्षात् देव भेटल्याचा आनंद झाला आणि भावाश्रूंची संतत धार लागली. परात्पर गुरु डॉक्टर अगदी लहान बाळासारखे दिसत होते.

आ. पू. डॉ. ॐ उलगनाथन्  यांची कन्या ॐ अक्षरा नृत्य करत असतांना मला ‘साक्षात् देवी नृत्य करत आहे’, असे वाटत होते. त्या वेळी देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा लाभ परात्पर गुरु डॉक्टरांमुळे मिळाला; म्हणून त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

इ. पू. डॉ. ॐ उलगनाथन् परात्पर गुरु डॉक्टरांना ओवाळत असतांना गुरुदेव बाळकृष्णासारखे दिसत होते.

ई. गुरुदेवांवर पुष्पवृष्टी होत असतांना त्यांचे ध्यान लागले. तेव्हा ते मंदिरात असलेल्या मूर्तीसारखे दिसत होते.’

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात असलेला भाव

अ. पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी जीवनाडीपट्टीत लिहिलेला परात्पर गुरु डॉक्टरांचा जीवनपट वाचत असतांना ‘ते श्रीविष्णूचे अवतार आहेत’, हे वाक्य ऐकल्यावर मार्च २०१३ मध्ये लिहून ठेवलेली माझी एक अनुभूती मला आठवली. त्या अनुभूतीत मी लिहिले होते, ‘परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही सर्व साधकांना सांगता, ‘मी कृष्ण नाही. मी तुमच्यासारखा माणूस आहे’ किंवा ‘साधकांनो, मी हरलो, तुम्ही जिंकलात !’ आम्हा सर्व साधकांना आपण आमच्यावर करत असलेली कृपा समजलीच होती. त्यामुळे आपल्या वर्णनानुसार ‘आपण ईश्‍वर आहात’, हे आम्ही ओळखलेच होते.’

आ. मला तर सतत आपली आठवण आली की, ‘आपण श्रीविष्णूचेच अवतार आहात’, असेच वाटायचे.

इ. ‘परात्पर गुरु डॉक्टर, बर्‍याचदा आपली प्राणशक्ती अल्प असते. आपण बेशुद्धही पडता. आपणास महामृत्यूयोग आहे’, हे सर्व साधकांना समजल्यावर त्यांना वाईट वाटते; परंतु मला पूर्ण खात्री आहे आणि माझी श्रद्धा आहे, ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् ईश्‍वर आहेत. त्यांना काहीही होणार नाही.’ त्यामुळे मला कधीच वाईट वाटले नाही.

ई. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा देहत्याग मानवासारखा नसून देवतांसारखा असेल ! जसे दत्तगुरु आपल्या भक्तांचा निरोप घेऊन अदृश्य झाले, त्याप्रमाणेच परात्पर गुरु डॉक्टरसुद्धा त्यांच्या देहत्यागाविषयी  साधकांना मार्गदर्शन करतील. त्यांची समाधी असे काही नसेल’, असे मला वाटते.

उ. ‘घराघरांत परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पूजले जाईल.’

असे सर्व विचार मी मार्च २०१३ मध्ये लिहून ठेवले होते.

३. देवाने साधकांच्या मनातील विचार ओळखून परात्पर गुरु डॉक्टरांमधील विष्णुतत्त्व प्रकट करून साधकांना पोचपावती देणे

परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या अखंड कृपेमुळेच या क्षुद्र जिवाला आपल्यातील विष्णुतत्त्व ‘याची देही याची डोळा ।’ अनुभवता आले. भावसोहळा चालू झाल्यापासून तो पूर्ण होईपर्यंत भाव सतत जागृत होत होता. परात्पर गुरु डॉक्टरांना ‘तुम्ही कृष्ण आहात, विष्णु आहात’, असे सांगूनही ते मान्य करत नव्हते. आता प्रत्यक्ष देवानेच आमच्या मनातील विचार ओळखून त्यांच्यातील विष्णुतत्त्व प्रकट करून आम्हाला पोचपावती दिली.

४. परात्पर गुरु डॉक्टरांमुळे ‘साक्षात् ईश्‍वर मानवाच्या रूपात कसा असतो ?’, ते अनुभवता येणे

भगवंताचे वर्णन ग्रंथांमध्ये किंवा पुराणांमध्ये वाचले होते; परंतु ‘साक्षात् ईश्‍वर मानवाच्या रूपात कसा असतो ?’, ते आता अनुभवता आले. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. परात्पर गुरु डॉक्टर, केवळ आपले नाव घेतले, तरी माझे डोळे पाणावतात !

‘भगवंता, माझ्याकडून अनंत चुका होतात. त्यांचे पापक्षालन करण्यासाठी या जिवाकडून कठोर साधना करून घे आणि या जिवाला तुझ्या चरणी विलीन करून घे’, एवढीच अखेरची प्रार्थना आहे.’

– तुझ्या चरणी विलीन होण्यासाठी तडफडणारी, एक साधिका, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.५.२०१५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक