आध्यात्मिक प्रगल्भतेच्या संदर्भात साधकाला सुचलेली सूत्रे !

‘१.११.२०२४ या दिवशी मला पहाटे जाग आली. माझ्या मनात ‘आध्यात्मिक प्रगल्भता म्हणजे काय ?’, याविषयी विचार येऊ लागले. आरंभी मी त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु त्यानंतर मला झोप आली नाही. त्या वेळी मला सुचलेले विचार येथे दिले आहेत. 

श्री. दीप संतोष पाटणे

१. साधनेला आरंभ केल्यावर करायचे प्रयत्न

अ. प्रत्येक कृती शुद्ध हेतूने करावी.

आ. अनावश्यक बोलणे टाळून अधिकाधिक लक्ष नामजपाकडे द्यावे.

इ. आवश्यक तेथेच व्यावहारिक गोष्टींना वेळ द्यावा; अन्यथा साधना आणि सेवा यांनाच प्राधान्य द्यावे.

२. मनाच्या स्तरावर करायचे साधनेचे प्रयत्न

अ. कोणत्याही गोष्टीसाठी तक्रार करणे टाळावे.

आ. सकारात्मक आणि निरपेक्ष राहून साधनेचे प्रयत्न करावेत.

इ. ‘इतरांनी मला समजून घ्यावे’, असे वाटण्यापेक्षा स्वतः इतरांना समजून घेण्यासाठी प्रयत्न करावा.

ई. ‘स्वतःला महत्त्व मिळावे’, अशी अपेक्षा न करता आहे त्या परिस्थितीत समाधानी रहावे.

उ. ताण न घेता अडचणींवर उपाययोजना काढून त्या सोडवाव्यात.

ऊ. इतरांना मानसिक किंवा भावनिक स्तरावर न हाताळता आध्यात्मिक स्तरावर हाताळावे.

ए. अतीचिकित्सा आणि इतरांशी तुलना करणे टाळून कृतज्ञताभाव वाढवावा.

ऐ. ‘मी आणि माझे’, असे विचार सोडून इतरांचा विचार वाढवावा.

३. शिकण्याच्या स्थितीत रहाणे

अ. परिस्थितीला दोष न देता ‘देव त्यातून काय शिकवत आहे ?’, याकडे लक्ष देऊन प्रसंगातून शिकावे.

आ. इतरांकडून शिकावे आणि वर्तमानकाळात रहावे.

इ. फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहावे.

४. चुकांविषयी गांभीर्य

अ. स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे सांगाव्यात.

आ. इतरांचे स्वभावदोष न पहाता ‘मी कुठे अल्प पडतो ?’, ते सातत्याने पहावे.

इ. चुकांवर स्पष्टीकरण न देता त्या मनापासून स्वीकाराव्यात आणि त्यांवर प्रयत्न करावेत.

५. ईश्वराप्रती दृढ श्रद्धा ठेवणे

अ. ‘ईश्वर कर्ता-करविता आहे’, ही जाणीव दृढ करून कर्तेपणा ईश्वरचरणी अर्पण करावा.

आ. स्वतःचे वेगळे अस्तित्व न जपता ‘मी आणि ईश्वर एक आहे’, याची जाणीव दृढ करावी.

इ. ‘भगवंत जीवनाचा केंद्रबिंदू आहे’, ही जाणीव दृढ करून भगवंतावर सर्व भार सोपवावा.

ही सूत्रे लिहून झाल्यावर माझे मन शांत झाले आणि मला झोप लागली. ‘गुरुदेवांच्या कृपेनेच मी अनुभूती घेऊ शकलो’, त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.११.२०२४)