समष्टीत चुका सांगतांना साधिकेच्या मनाची असणारी स्थिती आणि तिला आलेल्या अनुभूती

१. चुका सांगतांनाची मनाची स्थिती

कु. सुप्रिया जठार

अ. ‘समष्टीत चूक सांगण्यापूर्वी मला नेहमी सदगुरु पिंगळेकाका यांच्या मार्गदर्शनातील पुढील वाक्ये आठवतात, ‘साधक म्हणजे गुरूंचे समष्टी रूप आहे’ आणि ‘जो पापी आपले पाप ओरडून जगाला सांगतो, तो महात्मा बनण्याच्या पात्रतेचा असतो.’

आ. ‘गंगा नदीत स्नान केल्याने आपली पापे नष्ट होतात. अगदी तसेच समष्टीत चुका सांगितल्याने त्या चुकांमुळे आपल्याला लागलेले पाप नष्ट होते. ज्या स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होऊन पाप निर्माण होते, ते स्वभावदोष अन् अहंही नष्ट होऊ लागतात आणि आपले चित्त शुद्ध होऊ लागते. त्यामुळे ‘समष्टीत आपल्या चुका मांडून क्षमायाचना करणे, म्हणजे ‘गंगास्नान’ केल्यासारखेच आहे’, असे मला जाणवते.

२. चुका समष्टीत सांगितल्यावर येणार्‍या अनुभूती

अ. ‘समष्टीत स्वत:ची चूक सांगतांना मला जाणवते, ‘माझ्या अनाहत चक्रातून त्रासदायक लहरी बाहेर पडत आहेत. गुरूंच्या व्यापक चैतन्यामुळे त्या त्याच क्षणी नष्टही होत आहेत.’

आ. स्वत:ची चूक सांगितल्यानंतर, ‘माझे मन हलके झाले आहे. माझे मन ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी सक्षम बनत आहे,’ असे मला जाणवते.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मी अशी अनुभूती प्रतिदिन घेत आहे. त्यामुळे समष्टीत चुका सांगण्याचे माझे प्रयत्न मनापासून होऊ लागले आहेत. चित्तावरचे कुसंस्कार नष्ट करण्याचे अद्भूत सामर्थ्य असलेल्या गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक