हरिद्वार, १४ एप्रिल (वार्ता.) – ॐ मध्ये जोपर्यंत बिंदू आहे, तोपर्यंत हिंदू रहातील. ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ (कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.) असे कलियुगात म्हटले जाते; मात्र आज आवश्यकता आहे ती ‘संत शक्तिः कलौ युगे’ या उद्घोषाची ! धर्माला आलेल्या ग्लानीच्या वर्तमानकाळात संतांची संघटित शक्ती हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते, असे उद्गार अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी (माऊली सरकार) यांनी १३ एप्रिल या दिवशी येथे केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या निमित्ताने कनखलमधील श्री रुक्मिणी विदर्भ पीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, अनेक संत, महंत आणि भाविक उपस्थित होते. या वेळी ‘दैनिक भास्कर’चे संपादक श्री. मदन सोहनीवाल, सैन भक्ती पिठाचे उपाध्यक्ष सेठ श्री. घासीराम वर्मा, श्री. शंकरसिंह राजपुरोहित, श्री. राम नरेश, श्री. श्याम बाबू आदी मान्यवर उपस्थित होते.
३१ डिसेंबर नव्हे, तर गुढीपाडव्याला नववर्ष ही आमची भारतीय परंपरा ! – श्री श्री १००८ सैनाचार्य स्वामी अचलानंदगिरी महाराज
कनखल येथील सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राच्या ठिकाणी अखिल भारतीय सैन भक्ती पीठ ट्रस्टचे पिठाधिश्वर श्री श्री १००८ सैनाचार्य स्वामी अचलानंदगिरी महाराज यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. या वेळी मार्गदर्शन करतांना श्री श्री १००८ सैनाचार्य स्वामी अचलानंदगिरी महाराज म्हणाले, ‘‘३१ डिसेंबरच्या रात्री सर्व लोक नवीन वर्षाचे स्वागत करतात, ते चुकीचे आहे. या रात्रीच्या वेळी जागरण करून मद्य पिणे, ‘हॅप्पी न्यू इयर’ म्हणणे चुकीचे आहे. हा ‘हॅप्पी न्यू इयर काय असतो ?’ हिंदूंचे नवीन वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला असून ही आमची भारतीय परंपरा आहे.’’
शहरातील सप्तसरोवर रस्त्यावरील शदाणी दरबार येथे नववर्षाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि शदाणी दरबारचे श्री. अमर उपस्थित होते. या वेळी पृथ्वीवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करण्याची शपथ सर्वांनी घेतली.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आले ३ ठिकाणी धर्मध्वजपूजन !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी येथील कुंभनगरीतील श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कनखल येथील सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र, तर सप्त सरोवर येथील शदाणी दरबार अशा ३ ठिकाणी धर्मध्वजाच्या पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सरकारने मंदिरे आणि मठ संत अन् भक्त यांच्याकडे सोपवावे ! – जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी
सरकार मंदिरे आणि मठ यांचे अधिग्रहण करत आहे; परंतु हे करतांना अनेक मंदिरे अन् मठ येथील व्यवस्थापनात त्रुटी आहेत. यासाठी सरकारने मंदिरे आणि मठ संत अन् भक्त यांच्याकडे सोपवले पाहिजेत. हिंदूंची विचारधारा जरी वेगवेगळी असली, तरी धर्मासाठी हिंदू एक आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. असा संकल्प आजपासून हिंदूंनी करण्याची आवश्यकता आहे.
सनातन संस्थेच्या मराठी भाषेतील २ नूतन ग्रंथांचे प्रकाशन
या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेला मराठी भाषेतील ‘आध्यात्मिक काव्यसंग्रह’ आणि हिंदी भाषेतील ‘आपातकालमें जीवित रहने हेतु दैनिक आवश्यकताओं की व्यवस्था करें !’ या ग्रंथांचे संतांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ‘आध्यात्मिक काव्यसंग्रह’ हा ग्रंथ अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी यांच्या हस्ते, तर ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन गरजांची व्यवस्था करा !’ हा ग्रंथ श्री श्री १००८ सैनाचार्य स्वामी अचलानंदगिरी महाराज यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.