नववर्षाचा संकल्प !

आज गुढीपाडवा ! हिंदूंच्या नववर्षाचा पहिला दिवस ! अनेक संकल्प करण्याचा हा दिवस आहे; मात्र हिंदूंमध्ये १ जानेवारी हा नववर्ष दिन साजरा करण्याचा मोठा प्रघात पडल्याने याकडे त्या दृष्टीने पहाण्याचा भाग अल्प झाला आहे, हे नाकारता येणार नाही. हिंदूंमध्ये या नववर्षाच्या निमित्ताने जागृती करण्याचा प्रयत्नही हिंदु संघटनांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याला यशही येत आहे. पूर्वी केवळ हिंदू विशेषतः मराठी लोक घरावर गुढी उभारून तो साजरा करत होते आणि आजही करत असले, तरी आज मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढून हिंदु संस्कृतीचे प्रदर्शन करत गुढीपाडवा साजरा केला जातो. त्याला देशभरात आणि विदेशातही प्रसिद्धी मिळत आहे. विदेशातही जेथे हिंदु आणि विशेषतः मराठी बांधव मोठ्या संख्येने आहेत तेथे मिरवणुका काढून गुढीपाडवा साजरा केल्याचे दृश्य काही वर्षांत दिसू लागले आहे.

गुढीपाडवा शोभायात्रा

केंद्रातील काँग्रेसचे सरकार गेल्यापासून देशातही काही प्रमाणात हिंदुत्वाला ऊर्जितावस्था आली आहे. त्यातही विशेष करून उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचा कारभार पहाता हिंदूंच्या जुन्या जखमा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रीरामजन्मभूमीचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागल्यानंतर आता श्रीराममंदिराचे भूमीपूजनही झाले आहे. प्रत्यक्ष बांधकामालाही प्रारंभ झाला आहे. येत्या २-३ वर्षांत भव्य श्रीराममंदिरही उभे राहील.

श्रीरामामुळे अयोध्येत रामराज्य आले. आतंकवाद, नक्षलवाद, धर्मांध आणि समाजकंटक यांच्यामुळे आजचा  समाज भयग्रस्त झाला आहे. आज   ‘देशात रामराज्य निर्माण करायचे आहे’, अशी स्थिती निर्माण करून खरी गुढी उभारायची आहे, हे लक्षात घेऊन या गुढीपाडव्याला अशी स्थिती निर्माण करण्यासाठी संकल्प करण्याची नितांत आवश्यकता आहे. संकल्प केल्याविना किंवा एक ध्येय ठेवल्याविना कुठल्याही कार्याला दिशा रहात नसते. भारतामध्ये रामराज्य आणणे हा संकल्प हिंदूंनी करणे आवश्यक आहे. अनेक संत महात्मे आणि द्रष्टे यांनी सांगितल्यानुसार वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्र येणारच असले, तरी त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. हे हिंदु राष्ट्र ‘रामराज्य’ असण्यासाठी तसे प्रयत्नही होणे आवश्यक आहे.

प्रसुतीवेदना सहन करा !

जगातील कोणताही पालट सहज होत नसतो. मनुष्य किंवा कुठलाही जीव, जंतू, प्राणी यांचा जन्म प्रसुतीवेदनेविना होत नसतो. सध्याचा काळ हा प्रसुतीवेदनेचा आहे. ही वेदना प्रत्येकाला सहन करावी लागणार आहे. यातूनच पुढे हिंदु राष्ट्र म्हणजे ईश्‍वरी राज्य, रामराज्य याची स्थापना होणार आहे. क्रांती आणि उत्क्रांती होतांना अनेक उलथापालथ होत असतात. या काळात मोठी हानी होत असते; मात्र त्यानंतर जे येते ते अत्यंत चांगले असते, असे आतापर्यंतचा इतिहास आहे. सध्याची देशाचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची स्थिती पाहिली, तर चिंताजनक झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाला ठप्प केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. हे अल्प म्हणून की काय जागतिक युद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात पुढील एक मासात युद्ध होऊन त्याची परिणती जागतिक युद्धात होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. भारतातील ज्योतिषांच्या मते पुढील वर्षात भारतात आणीबाणी आणि युद्ध स्थिती निर्माण होऊ शकते. संतांनी आणि द्रष्टे यांनी सांगिल्यानुसार तिसरे महायुद्ध होऊन मोठा नरसंहार होणार आहे. त्यानंतर धर्माचे राज्य येणार आहे. त्यामुळे हा काळ मोठा कसोटीचा असणार आहे. त्यातही गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग काही प्रमाणात तरी कसोटीचा सामना करत आहे. ‘लस आल्यावर कोरोना संपेल’, असे म्हणत असतांना त्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढणे, हेच या संकटाचे द्योतक आहे, असे समजल्यास चुकीचे ठरणार नाही. या संकटाला भारतीय जनता सामोरे जाण्यास उत्सुक नाही, असे त्यांच्या सध्याच्या वागणुकीवरून दिसत आहे. संकटाला सामना करण्यासाठी आणि ते परतवून लावण्यासाठी काही नियम पाळावे लागतात, कृती करावी लागते, असे होतांना आज दिसत नाही. लोकशाहीतील सर्वपक्षीय शासनकर्तेही यात मोठ्या प्रमाणात अपयशी ठरले आहेत. त्यांनी समाजाला आतापर्यंत शिस्त आणि संकटात कसे वागायचे हे न शिकवल्याचा परिणाम पहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते कोरोनाचे संकट पुढील २ वर्षेतरी कायम असण्याची शक्यता आहे. याच काळात युद्ध झाल्यास जगासमोर काय स्थिती असणार याची कल्पना आताच्या स्थितीवरून करता येऊ शकते. युद्ध काळात किंवा आणीबाणीच्या वेळी दोन वेळचे जेवण मिळेल कि नाही, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. अशा पार्श्‍वभूमीवर केवळ गुढी उभारून नववर्ष साजरा करून थांबता येणार नाही. हे नववर्ष सुखाचे आणि समाधानाचे असावे, ही स्थिती पुष्कळ लांब असेल; मात्र या वर्षांत जीवितरक्षण व्हावे, यासाठीच संघर्ष करावा लागणार आहे. तसा संघर्ष करण्याची मानसिकता निर्माण करून स्वतःचे अस्तित्व कसे टिकवता येईल, याचे नियोजन करून त्यानुसार वागावे लागेल. शासनकर्ते, प्रशासन, पोलीस आपले रक्षण करतील, असा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल; कारण संकटच मोठे असणार, हे लक्षात घेतले पाहिजे.

श्रीरामाला शरण जा !

सूक्ष्म तितके अधिक शक्तीशाली असे म्हटले जाते. एका कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अणूबॉम्बमुळे जितकी हानी किंवा परिणाम होणार नाही त्याच्या सहस्रावधी पटींनी कोरोनाचा परिणाम दिसत आहे. अशा सूक्ष्म शक्तीचा निःपात करण्यासाठी तितकीच परिणामकारक सूक्ष्मशक्तीची आवश्यकता आहे. भगवान श्रीरामाने रावण आणि अन्य असुर यांचा नाश करण्यासाठी मारलेले बाण हे मंत्रांनी भारित होते. त्यामुळे त्याची परिणामकारकता अधिक होती. त्यामुळे येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही) असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.