‘गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने प्रसाद म्हणून ग्रहण करतात. त्यामुळे या ऋतूमध्ये होणार्या विकारांवर कडूनिंब हे सुयोग्य औषध आहे. कडूनिंबाच्या पानांचा उपयोग पुढीलप्रमाणे करावा.
१. रस काढण्याची पद्धत आणि प्रमाण
कडूनिंबाची वाटीभर ताजी पाने स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. त्यात थोडे पाणी घालून त्याचा अर्धा कप रस काढावा आणि हा रस सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा. लहान मुलांना पाव कप रस देऊ शकतो. रस घेतल्यावर त्यावर गुळाचा खडा खावा. रस घेतल्यावर किमान अर्धा घंटा काही खाऊ-पिऊ नये.
२. कडूनिंबाची ताजी पाने न मिळणार्यांसाठी उपाय
ज्यांना ताजी कडूनिंबाची पाने उपलब्ध होऊ शकत नाहीत, ते ‘नीमवटी’ (कडूनिंबाच्या पानांच्या चूर्णाच्या गोळ्या) घेऊ शकतात. दोन गोळ्या सकाळी रिकाम्या पोटी थोड्याशा पाण्याच्या समवेत घ्याव्यात. त्यानंतर अर्धा घंटा काही खाऊ-पिऊ नये. लहान मुलांना एक गोळी द्यावी. या गोळ्या मिळाल्या नाहीत, तर ‘गूळवेल घनवटी’ किंवा ‘गिलोय घनवटी’ या गोळ्या घेतल्या, तरी चालू शकते. या गोळ्या आयुर्वेदीय औषधांच्या दुकानांत मिळतात. असे ७ ते १४ दिवस करावे. त्यापेक्षा अधिक काळ हा उपचार करायचा झाल्यास वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. हा उपचार पावसाळा किंवा अन्य ऋतूंमध्ये करायचा झाल्यासही त्यापूर्वी वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
३. महत्वाची सूचना
‘कडूनिंबाची पाने वाळू नयेत’, यासाठी ती शीतकपाटात ठेवली, तरी चालते; पण रस काढून तो शीतकपाटात ठेवू नये. प्रतिदिन कडूनिंबाच्या पानांचा ताजा रस बनवावा. पुणे किंवा मुंबई यांसारख्या शहरांतही फुलवाल्यांकडे कडूनिंबाची पाने मिळतात.’
– गुरुचरणी,
वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, टिटवाळा, जिल्हा ठाणे. (७.४.२०२१)