एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

रुग्णालय म्हणजे आरोग्य केंद्र ! जनतेला आरोग्यविषयक काही अडचणी आल्यास, कुणी रोगग्रस्त झाल्यास ज्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन आणि उपचार घेऊन व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते, असे ठिकाण ! मात्र कलिच्या प्रभावापासून ही ठिकाणेही सुटलेली नाहीत. त्यामुळे या आरोग्यकेंद्रांची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. एका साधिकेने एका मोठ्या रुग्णालयात अनुभवलेली अशी विदारक स्थिती येथे देत आहोत.

१. साहित्य आणि वास्तू

१ अ. दर्शनीय भागात ठेवलेल्या मोडकळीस आलेल्या आणि खिळखिळ्या झालेल्या आसंद्या (खुर्च्या) अन् त्यांविषयीची उदासीनता ! : रुग्णालयात गेल्यावर समोरच दर्शनीय भागात बाहेरून आलेले रुग्ण आणि त्यांच्या समवेतच्या व्यक्ती यांना बसण्यासाठी अनेक आसंद्या (खुर्च्या) ठेवलेल्या दिसतात. चांगल्या दिसत असल्या, तरी त्या मोडकळीस आलेल्या आणि खिळखिळ्या झालेल्या आहेत. त्यावर कुणी बसल्यास खाली पडून दुखापत होऊ शकते. पुष्कळ आसंद्या (खुर्च्या) अशा पडून आहेत. दिवसभर तेथून अनेक आधुनिक वैद्य (डॉक्टर्स), परिचारिका (नर्सेस), विद्यार्थी, कर्मचारी ये-जा करत असतात; परंतु कुणालाही त्याचे काही पडलेले नाही.

१ आ. नादुरुस्त पंखे आणि अनावश्यक चालू रहाणारे पंखे यांमुळे गैरसोय होणे ! : एकीकडे रुग्णालयातील अनेक पंखे नादुरुस्त झाल्यामुळे बंद स्थितीत, तर दुसरीकडे अनेक पंखे अनावश्यक चालू असतात. यामुळे भर उन्हाळ्यात रुग्णांना उकाड्याचा पुष्कळ त्रास सहन करावा लागतो.

१ इ. रुग्णांची गैरसोय करणारी आणि विजेचा व्यय करणार्‍या एकाच बटणावर तीन दिवे चालू करण्याची व्यवस्था ! : रुग्णालयातील विभागात (वॉर्डमध्ये) ओळीने ३ रुग्ण झोपू शकतील, अशी व्यवस्था आहे. प्रत्येक ओळीत प्रत्येक रुग्णाच्या पलंगावर एक दिवा आणि एक पंखा आहे, म्हणजे प्रत्येक ओळीत ३ दिवे आहेत. त्या तीन दिव्यांना मिळून एकच कळ (बटण) आहे. त्यामुळे एक दिवा लावायचा असल्यास तिन्ही दिवे लागतात आणि एक दिवा बंद करायचा असल्यास तिन्ही दिवे बंद होतात. यात रुग्णांची गैरसोय तर होतेच, विजेचा व्ययही होतो. या सामान्य गोष्टीचाही विचार केला जात नाही, याचे आश्‍चर्य वाटते !

१ ई. रुग्ण आणि सामान्य जन यांचा विचार न करता भ्रमणभाष संच भारीत करण्यासाठी लावलेले कुलुप असलेले ‘प्लग’ ! : रुग्णालयात भ्रमणभाष संच भारीत करण्याची (चार्जिंगची) सोय आहे; मात्र त्या ‘प्लग’ला ‘लॉक’ पद्धत आहे. त्यामुळे सहजतेने कुणीही भ्रमणभाष संच भारीत करू शकत नाही. ते लॉक काढण्यासाठी त्यामध्ये एखादी काडी, पेन इत्यादी घालून लॉक काढावे लागते. या रुग्णालयात बहुतांश गरीब कुटुंबांतील रुग्ण येतात. त्यांना असल्या अत्याधुनिक पद्धती ठाऊक नसतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या हाताला सलाईन, इंजेक्शन आदी दिल्यामुळे त्यांना हात दुखणे, जड होणे, सुन्न होणे असे त्रास होत असतात. अशा वेळी रुग्णांना सहजतेने भ्रमणभाष संच भारीत करण्याची सोय हवी.

१ उ. रुग्णांच्या सुरक्षेचा विचार नसलेल्या मोठ्या उघड्या खिडक्या ! : खोल्या अथवा विभाग (वॉर्ड) यांना दाराप्रमाणे मोठ्या खिडक्या आहेत. त्यांना लोखंडी गज अथवा जाळी असे काहीच लावलेले नाही. त्यामुळे एखादा मानसिक रुग्ण खिडकीतून पळून जाऊ शकतो अथवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू शकतो. सुरक्षेचा विचार झालेला दिसत नाही.

२. रुग्णालयातील स्वच्छतेची ऐशी-तैशी

२ अ. स्वच्छता करण्यातील पाट्याटाकूपणा : स्वच्छता करणारे कर्मचारी पाट्याटाकूपणे स्वच्छता करतात. उदा. मॉपने लादी पुसतांना उजव्या कोपर्‍यातून मॉप निघाला की, डाव्या कोपर्‍यात जाऊनच तो थांबतो ! तेथील स्वच्छता करणार्‍या महिला कर्मचार्‍याला योग्य पद्धत सांगितल्यावर ती म्हणाली, ‘तूच बसली आहेस म्हणून मला पुसता येत नाही. समोरच्या ओळीत एकही रुग्ण नसल्याने ती जागा रिकामीच होती, तरीही ती महिला कर्मचारी अशाच पद्धतीने लादी पुसत होती.

२ आ. अंथरूण-पांघरूण

२ आ १. मळलेले आणि रक्ताचे डाग पडलेले अंथरूण-पांघरूण रुग्णांना वापरण्यास देणे : रुग्णाला दिलेले अंथरूण-पांघरूण खूपच मळलेले आणि रक्ताचे डाग पडलेले होते. ३-४ दिवसांनंतर ते पालटण्याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे दुसरे अंथरूण-पांघरूण नाही. त्यामुळे तेच वापरावे लागेल. त्यावर रक्ताचे डाग पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर तेथील परिचारिकेने सांगितले की, ते धुतलेले असल्याने तेच वापरावे. दुसरे मिळणार नाही.

२ आ २. रुग्णांनी स्वतःचे अंथरूण-पांघरूण वापरले, तरी त्यांना रागावणे : एक रुग्ण महिला घरून आणलेले स्वत:चे पांघरूण घेऊन झोपली होती. एक परिचारिका आली आणि ‘तू तुझे पांघरूण का घेतेस ? येथे तुला दिले आहे ना, तेच वापर. रुग्ण कोण आहे, आम्ही कसे ओळखणार ?’ असे रुग्ण महिलेला जोराने रागावून तावातावाने निघून गेली. हे दृश्य पाहिल्यावर वाटले की, एक तर रुग्णांना व्यवस्थित अंथरूण-पांघरूण देत नाहीत, त्याविषयी विचारायला गेल्यावर रागाने बोलतात अथवा दुर्लक्ष करतात आणि रुग्णांनी त्यांचे वैयक्तिक पांघरूण वापरले, तर त्यावरही रागावतात. ही कसली पद्धत ? रुग्णालयातील कर्मचार्‍यांना रुग्णांची एवढी काळजी असेल, तर त्यांना चांगले अंथरूण-पांघरूण द्यायला हवे.

२ इ. पाणी

२ इ १. पाण्याचा तुटवडा असणे : राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असलेले हे एक मोठे रुग्णालय ! येथे प्रत्येक दिवशी सहस्रो लोक येत असतात; मात्र या रुग्णालयात पाण्याचा नेहमीच तुटवडा असतो. प्रत्येक वॉर्डमधील स्नानगृहात प्लास्टिकच्या  दोन पिपांत पाणी भरून ठेवलेले असते. एका वार्डमध्ये ३० रुग्ण, त्यांच्या समवेतच्या व्यक्ती आणि तेथील कर्मचारी असे न्यूनतम ७०-८० जणांसाठी तेवढेच पाणी असते. या पाण्याचा उपयोग मल-मूत्र विसर्जन, हात-पाय धुणे, तोंड धुणे, अंघोळ करणे आणि कपडे धुणे, भांडी धुणे यांसाठी करावा लागतो !

२ इ २. पाण्याविना अस्वच्छ असलेली आणि दुर्गंध भरलेेली रुग्णालयातील स्नानगृहे, प्रसाधनगृहे आणि हस्तप्रक्षालन पात्रे : स्नानगृह, प्रसाधनगृह आणि हस्तप्रक्षालनपात्र (वॉश बेसिन) यांपैकी कुठेच नळाला पाणी येत नाही. हस्तप्रक्षालनपात्राचा उपयोग केवळ हात, तोंड धुण्यासाठी न करता त्यातच जेवलेली भांडी धुणे, रुग्णांनी उलटी केलेली आणि लघवी केलेली भांडी धुणे अशांसाठीही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे ती खूपच अस्वच्छ असतात. पाणी नसल्याने खूप दुर्गंध येत असतो. आम्ही असलेल्या वॉर्डमध्ये एकूण तीन हस्तप्रक्षालनपात्रे होती. त्यांपैकी एक बंद स्थितीत, दुसरे फुटलेले आणि तिसरे नेहमी तुंबलेले असायचे. त्यामुळे लोकांची नेहमीच गैरसोय होते.

३. तांब्या किंवा ‘मग’ ऐवजी सलाईनच्या बाटलीचा वरचा भाग कापून केलेला डबा ठेवलेला असणे

पिंपातून पाणी घेण्यासाठी एक प्लास्टिकची बालदी आणि तांब्या किंवा ‘मग’ ऐवजी सलाईनच्या बाटलीचा वरचा भाग कापून केलेला एक डबा ठेवलेला आहे. शौचालयात जाण्यासाठी, हात-पाय-तोंड धुण्यासाठी, अंघोळीसाठी, कपडे अथवा भांडी धुण्यासाठी याच बालदीचा आणि डब्याचा उपयोग करावा लागतो !

४. रुग्णांच्या अडचणींचा विचार न होणे

एक तर रुग्ण हातात काही तरी जड साहित्य उचलतील, अशी त्यांची स्थिती नसते. दुसरे म्हणजे त्यांच्या हाताला सलाईन, इंजेक्शन अथवा रक्त तपासणी इत्यादीसाठी सुया टोचलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा हात खूप जड झालेला असतो. काही वेळा हाताला सूजही आलेली असते. त्या हाताने काहीच करता येत नसते. अशा स्थितीत पाण्याची मोठी बालदी उचलणे तर शक्यच नसते. प्लास्टिकचा डबा हातात व्यवस्थित धरता येत नाही. तो हातातून निसटतो. नाईलाजास्तव त्यांना या डब्याचाच उपयोग करावा लागतो. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते.

५. अंघोळ न केल्याने रुग्ण बरे होण्याऐवजी त्यांच्या त्रासांत वाढ होणे

नियमित अंघोळ केल्याने कोणत्याही आजाराची तीव्रता काही कालावधीपर्यंत २०-२५ टक्क्यांनी घटते; मात्र पाण्याचा तुटवडा आणि अस्वच्छता यांमुळे रुग्णालयात असेपर्यंत रुग्ण क्वचित्च अंघोळ करतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्तरावरही परिणाम होऊन रुग्णांना थकवा येणे, निरुत्साह वाटणे अशा प्रकारचे त्रास होतात, तर काही जणांना त्वचारोग होतात.

– एक साधिका (६.४.२०१६)           (क्रमशः पुढच्या रविवारी)

आरोग्य साहाय्य समितीची वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. तुम्हालाही वैद्यकीय क्षेत्रातील असे कटू अनुभव आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आरोग्य साहाय्य समितीस कळवा.

स्वतःचे अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
इ-मेल पत्ता : [email protected]