महाराष्ट्रातील घटनांमुळे सर्वसामान्य माणूस निराशेकडे चालला आहे ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप (छायाचित्र सौजन्य : ANI)

मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने घडणार्‍या घटनांमुळे सर्वसामान्य माणूस अचंबित होण्यापासून तो आता निराशेकडे चालला आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी ८ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीला वाझे इतके प्रिय आहेत की, देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात त्यांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर सभागृह ९ वेळा स्थगित करावे लागले. ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत जाऊन मी वाझे यांची भेट घेऊन अनिल परब यांचे नाव घ्यायला सांगितले’, हा आरोप हास्यास्पद आहे. राज्यात कोरोनावरील उपचारांचा गोंधळ उडाला आहे. लसीकरणाचा पत्ता नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. प्रत्येक विषयात केंद्रशासनाला दोष द्यायचा असेल, तर राज्य केंद्राकडेच चालवायला द्या. राष्ट्रपती राजवट लागायला यापेक्षा अन्य वेगळे काय हवे असते ? हे तज्ञांनी मला सांगावे.’’