श्रीनिवास रेड्डी आणि विनोद शिवकुमार या अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा !

महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेची मागणी

वन परिक्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार आणि वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण

अमरावती – जिल्ह्यातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस उत्तरदायी असणारे अपर प्रधान उपवन संरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि वन परिक्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा; अन्यथा महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी या संघटनेचे अध्यक्ष राजू साळुंके यांनी ६ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, बेलदार समाज अतिशय अल्पसंख्यांक असून राज्यात या समाजाची एकूण संख्या २५ लाख आहे. या समाजातील मुलगी दीपाली चव्हाण ही अभ्यास करून मेहनतीने अधिकारी झाली होती. असे असतांना रेड्डी आणि शिवकुमार यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ही एक प्रकारची हत्या असून या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३४, ३०२, ३०६, ३५४, २९४, ५०६, १०९ आणि ३१३ अन्वये गुन्हे नोंद करावेत, तसेच दीपाली चव्हाण यांना न्याय मिळण्यासाठी विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे. या प्रकरणाचे अन्वेषण राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) यांच्या वतीने करण्यात यावे. हे प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावे.