|
पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) – काँग्रेसचे १० माजी आमदार आणि मगोपचे २ माजी आमदार यांच्या विरोधातील अपात्रता प्रकरणी गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर २९ एप्रिल या दिवशी अंतिम निवाडा देणार आहेत.
या प्रकरणी ५ एप्रिल या दिवशी दुपारी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम निवाडा मिळेल अशी याचिकादारांना आशा वाटत होती; मात्र सभापती राजेश पाटणेकर यांनी सुनावणीच्या वेळी फुटीर आमदारांनी प्रविष्ट केलेल्या ३ अर्जांवर निकाल दिला. यामधील २ अर्ज फेटाळण्यात आले, तर १ अर्ज प्रविष्ट करण्यात आला. यामध्ये याचिकादार गिरीश चोडणकर यांची उलटतपासणी घेणे आणि काही पुरावे सुपुर्द करणे, हे दोन अर्ज फेटाळण्यात आले, तर लेखी प्रत्युत्तर देण्यास वेळ वाढवून देण्याची मागणी करणारा अर्ज स्वीकारण्यात आला.
अंतिम निवाडा येईपर्यंत काँग्रेसच्या फुटीर आमदारांना आमदार या नात्याने कार्य करण्यास न देण्याची मागणी धुडकावली
काँग्रेसचे अधिवक्ता अभिजीत गोसावी म्हणाले, ‘‘आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम निवाडा येईपर्यंत फुटीर आमदारांना आमदार या नात्याने कार्य करण्यापासून वंचित ठेवण्यासंबंधी अंतरिम आदेश देण्याची काँग्रेसची मागणी सभापती राजेश पाटणेकर यांनी फेटाळली आहे. प्रत्यक्षात काँग्रेसच्या १० माजी आमदारांनी बंडखोरी केल्याचे स्वत: स्पष्टपणे मान्य केले आहे. भारतीय राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टानुसार आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सुपुर्द करण्यात आली आहेत; मात्र सभापती राजेश पाटणेकर यांनी आमची मागणी अमान्य केली आहे.’’
सभापती अंतिम निवाडा देण्यास विनाकारण वेळकाढू धोरण अवलंबत आहेत ! – गिरीश चोडणकर
आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीनंतर पत्रकारांना याचिकादार गिरीश चोडणकर म्हणाले, ‘‘सभापती राजेश पाटणेकर हे पक्षपाती धोरण अवलंबत आहेत. ते या प्रकरणी अल्प महत्त्वाचे अर्ज हाताळण्यास वेळ देऊन अंतिम निवाडा देण्यास विनाकारण विलंब लावत आहेत. यामुळे सर्वांचाच वेळ वाया जात आहे. या प्रकरणी अजूनही अंतिम निवाडा न दिल्याने सभापती राजेश पाटणेकर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याच्या सिद्धतेत आहेत, असे वाटते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ६ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.’’
सभापती पाटणेकर निष्पक्षपातीपणे निवाडा देण्याची परंपरा अबाधित ठेवतील, अशी अपेक्षा ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगोप
गोवा विधानसभेच्या आजवरच्या सभापतींनी अपात्रता याचिकांवर निष्पक्षपातीपणे निवाडे दिले आहेत. विद्यमान सभापती राजेश पाटणेकर हीच परंपरा पुढे कायम ठेवतील, अशी आशा बाळगतो, असे मत आमदार अपात्रता प्रकरणातील अन्य एक याचिकादार आणि मगोपचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रकरणाच्या सुनावणीनंतर पत्रकारांकडे व्यक्त केले. आमदार सुदिन ढवळीकर यांच्या याचिकेवरही सभापती राजेश पाटणेकर यांनी ५ एप्रिलला सुनावणी घेतली आणि अंतिम निवाडा २९ एप्रिलपर्यंत राखून ठेवला.