कोरोनाची चुकीच्या पद्धतीने चाचणी केल्याने प्रयोगशाळा चालकाला अटक !

  •  आधुनिक वैद्य पसार 

  •  दोघांवर गुन्हा नोंद

अशा प्रकारे होणारा काळाबाजार म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंकच !

सातारा, ३१ मार्च (वार्ता.) – कोरोना चाचणी करण्याची कायदेशीर अनुमती नसतांना रुग्णांची चुकीच्या पद्धतीने चाचणी केल्याने यशवंत लॅबोरेटरीचे मालक इनामदार यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये  आधुनिक वैद्य वनारसे यांचा सहभाग आहे; मात्र ते पसार झाले आहेत.  त्या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१. पाटण तालुक्यातील नवसरी येथील दत्तात्रय उदुगडे यांना १४ नोव्हेंबर २०२० या दिवशी थकवा आणि कणकण जाणवल्याने उदुगडे हे मल्हारपेठ येथील वनारसे रुग्णालयात गेले. आधुनिक वैद्य वनारसे यांनी त्यांना सलाईन लावले. नंतर रक्तासह कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले.

२. उदुगडे यांची चाचणी करण्याला संमती नसतांनाही आधुनिक वैद्य वनारसे आणि यशवंत लॅबोरेटरीजचे मालक इनामदार यांनी बळजोरीने त्यांची रक्त चाचणी केली. वास्तविक रक्त चाचणी करण्याची यशवंत लॅबोरेटरीला कोणतीही कायदेशीर अनुमती नाही.

३. तपासणीनंतर कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असतांनाही तो ‘पॉझिटिव्ह’ दिला. यामुळे उदुगडे आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. ४. संबंधित आधुनिक वैद्य वनारसे आणि यशवंत लॅबोरेटरीचे मालक इनामदार यांच्यावर चुकीची रक्त चाचणी करण्यास प्रवृत्त करणे, रक्त चाचणी करणे, चुकीचा अहवाल आणि सल्ला देणे, तसेच कोविड चाचणीसाठी लागणार्‍या साहित्यांचा काळाबाजार करणे आदींची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उदुगडे यांनी पोलिसांकडे केली होती. त्याविषयीची तक्रार त्यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात जानेवारी २०२१ मध्ये दिली होती.

पोलिसांच्या कसून चौकशीनंतर यशवंत लॅबोरेटरीचे मालक इनामदार यांच्याकडे प्रयोगशाळा (लॅब) चालवण्यासाठी कोणतीही कायदेशीर अनुमती नसल्याचे निदर्शनास आले. तसेच तक्रारदाराचीही फसवणूक झाल्याचे पोलीस अन्वेषणात निष्पन्न झाले.