चैतन्यमय वाणीतून साधकांवर प्रीतीचा वर्षाव करून त्यांच्याशी सहजतेने जवळीक साधणारे सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर !  

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (३०.३.२०२१) या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त अमरावती येथील साधिका सौ. कंचन श्याम शर्मा यांनी त्यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. अशोक पात्रीकर

पू. अशोक पात्रीकर यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. पू. अशोक पात्रीकर अमरावती येथे आल्यावर त्यांची भेट होणे 

‘मी साधनेत आल्यापासून पू. पात्रीकरकाकांना ओळखते. त्यांनी संपूर्ण कुटुंबासह साधनेला वाहून घेतले; म्हणून ते मला प्रारंभापासूनच आदरणीय आहेत. मी सत्संगासाठी सेवाकेंद्रात गेल्यावर माझी त्यांच्याशी भेट झाली. त्या वेळी माझ्या मुलाला फोड झाल्यामुळे प्रचंड वेदना होत होत्या; म्हणून मी पू. पात्रीकरकाकांना उपाय विचारला. तेव्हा त्यांनी मंत्रोपाय सांगितले. तेव्हापासून आतापर्यंत माझ्या जीवनात काही वाईट प्रसंग घडल्यास पू. पात्रीकरकाकांनी मला आध्यात्मिक स्तरावर सर्वतोपरी साहाय्य केले आहे. ते मी कधीच विसरू शकत नाही.

२. पू. पात्रीकरकाकांशी सहजतेने आणि मोकळेपणाने बोलता येऊन ‘ते कुटुंबातील एक सदस्य आहेत’, असे वाटणे

मी पू. पात्रीकरकाकांशी सहजतेने आणि मोकळेपणाने बोलू शकते. मला ‘ते कुटुंबातील एक सदस्य आहेत’, असे वाटते. त्यांनी ‘स्वभावदोष निर्मूलन सत्संगात केलेले मार्गदर्शन आणि दिलेले दृष्टीकोन’ यांमुळे मी माझ्या जीवनातील कठीण प्रसंग सहन करू शकले. माझ्या सासूबाईंना पुष्कळ आध्यात्मिक त्रास होता. तेव्हा पू. पात्रीकरकाकांनी मला मंत्रोपाय आणि अन्य उपाय सांगून आम्हाला धीर दिला.

सौ. कंचन श्याम शर्मा

३. कौटुंबिक प्रसंगांत केलेले आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य

३ अ. स्वतःचे आणि मुलाचे त्रास वाढल्याच्या कालावधीत पू. पात्रीकरकाकांच्या माध्यमातून परात्पर गुरुमाऊलींची कृपा अनुभवणे : त्या कालावधीत माझे आणि मुलाचे त्रास वाढले. आमचे घरात भांडण व्हायचे अन् त्यासाठी काही कारण नसायचे. आमच्या घरात सतत दाब जाणवायचा. माझे यजमान या प्रसंगात अलिप्तपणे वागत असत. यामध्ये माझी मुलगी भरडून जात असे; पण ती स्थिर असायची. तीच मला आणि भावाला समजावत असे. या प्रसंगात केवळ परात्पर गुरुमाऊली आम्हाला साहाय्य करू शकत होती. पू. पात्रीकरकाकांच्या माध्यमातून आम्ही गुरुमाऊलीची कृपा अनुभवत होतो. मी पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेले मंत्रजप करत होते. ‘हे प्रारब्ध भोगून संपवायचे आहे. त्यानंतर आनंद आहे’, ही माझी श्रद्धा होती. ‘या कठीण काळात भोग भोगण्याची शक्ती देण्यासाठीच परात्पर गुरुमाऊलींनी पू. पात्रीकरकाकांना येथे पाठवले आहे’, असे मला जाणवायचे.

३ आ. घरात मतभेद होत असल्याने पू. पात्रीकरकाकांनी घरी येऊन सर्वांना मोकळेपणाने बोलण्यास सांगणे : यजमानांना मुलाकडून पुष्कळ अपेक्षा होत्या. ‘मुलगा साधना करतो’, हे त्यांना पटायचे नाही. त्यांना वाटायचे, ‘मुलाने व्यवहारात पुष्कळ पुढे जावे.’ मुलाला आध्यात्मिक त्रासामुळे अभ्यासात अडचण येत होती. वडिलांचा दबाव आणि माझ्यामुळेही त्याला त्रास होत होता. त्यामुळे घरात सतत मतभेद आणि वादावादी चालू असे. एकदा पू. पात्रीकरकाकांनी आमच्या घरी येऊन सर्वांचा सत्संग घेतला. यजमान आणि मुलगा यांच्यामध्ये असलेल्या मतभेदांविषयी त्यांनी मोकळेपणाने सांगायला सांगितले. यामुळे त्यांच्यात मतभेद असले, तरी त्याची तीव्रता उणावली. पू. पात्रीकरकाका माझ्या सासूबाईंना भेटायला आले. तेव्हा ‘सासूबाईंनाही आनंद झाला’, याचे मला आश्‍चर्य वाटले; कारण त्यांना सनातनची व्यक्ती आवडत नसे आणि त्यांना सांगितले नाही, तरी त्या सनातनचे साधक ओळखायच्या. पू. पात्रीकरकाकांमधील चैतन्यामुळे माझ्या सासूबाईंनाही आनंद मिळाला.

३ इ. ‘प्रारब्ध संपल्यावर आणि काळ लोटल्यावर सर्व ठीक होईल’, असे पू. पात्रीकरकाकांनी सांगणे : पू. पात्रीकरकाकांनी मला जोमाने साधना करायला सांगितली. त्यांनी सांगितले, ‘‘प्रारब्ध संपल्यावर आणि काळ लोटल्यावर सर्व ठीक होईल.’’ त्यामुळे माझे मन गुरुचरणांशी स्थिर होऊ लागले. एक दिवस मुलाने पुढच्या शिक्षणासाठी होकार दिला आणि गुरुकृपेने तो प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचे शिक्षण चालू झाल्यावर माझे यजमान शांत झाले. त्या दोघांतील मतभेद दूर होऊन त्यांच्यात जवळीक झाली. माझ्यासाठी हे सर्व प्रसंग सहन करण्याच्या पलीकडचे होते; पण परात्पर गुरुमाऊलींनी पू. पात्रीकरकाकांच्या रूपात येऊन आम्हाला सावरले आणि त्यांनीच सर्व सहन करण्याची क्षमता दिली. पू. पात्रीकरकाकांनी मला चैतन्य देऊन या प्रसंगातून बाहेर काढले, त्यासाठी मी शब्दांत कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. मला त्यांचा पित्याप्रमाणे आधार वाटतो. पू. पात्रीकरकाकांची चैतन्यमय वाणी ऐकताच माझे मन शांत होते आणि मनातील शंका दूर होतात. पू. पात्रीकरकाकांचे आध्यात्मिक स्तरावरचे बोलणे ऐकल्यावर माझे मन अंतर्मुख होऊन मला स्वतःच्या चुकीची जाणीव होते.

३ ई. ‘साधनेतील अडचणी सोडवतांना क्षुल्लक वाटणार्‍या लहानशा गोष्टीकडेही बारकाईने लक्ष असणे आणि त्याच गोष्टीमुळे साधक अडकलेला आहे’, हे पू. काकांच्या नेमकेपणाने लक्षात येणे : मी त्यांच्याशी भ्रमणभाषवर १ – २ मिनिटे जरी बोलले, तरी मला सकारात्मक वाटते. पू. पात्रीकरकाका सर्व साधकांशी इतक्या सहजतेने वागतात की, ‘ते संत आहेत’, हे विसरायला होते. त्यांच्यात सर्वांप्रती पुष्कळ प्रेम आहे. ‘साधनेतील अडचणी सोडवतांना क्षुल्लक वाटणार्‍या लहानशा गोष्टीकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असते आणि त्याच गोष्टीमुळे साधक अडकलेला आहे’, हे नेमकेपणाने त्यांच्या लक्षात येते. ‘घरातील सेवा करतांना भाव कसा ठेवावा ? वेळेचे नियोजन कसे करावे ? साधनेत माहिती आणि विचार अडथळे कसे आणतात ?’, हे ते इतक्या सोप्या भाषेत सांगतात की, त्यांचे मार्गदर्शन पुष्कळ वेळ माझ्या मनात रहाते. प्रसंग घडत असतांना मला त्यांचे शब्द आठवतात आणि मनाला चुकीची जाणीव होते. ‘मला होणार्‍या त्रासांवर पू. पात्रीकरकाका नामजपादी उपाय सांगून मला साधनेचे दृष्टीकोन देत आहेत’, असे मला जाणवते. त्यामुळे त्या प्रसंगातून मी लवकर बाहेर पडते.

४. पू. पात्रीकरकाकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती 

४ अ. ‘नामजप बंद पडल्यावर पू. पात्रीकरकाका सूक्ष्मातून घरी येऊन मार्गदर्शन करत आहेत’, असे जाणवणे : माझ्या मनातील विचारांचे प्रमाण वाढून मला प्रतिक्रिया येतात आणि माझा नामजप बंद पडतो. त्या वेळी ‘पू. पात्रीकरकाका सूक्ष्मातून घरी येऊन मला मार्गदर्शन करत आहेत’, असे मला जाणवते. त्यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे मी सकारात्मक होते. एकदा मला बरे वाटत नसतांना मला कुणी विचारत नव्हते; म्हणून मला रडू येत होते. तेव्हा मला पू. पात्रीकरकाका सूक्ष्मातून जवळ उभे असलेले दिसले. त्यांनी मला माझ्यातील ‘अपेक्षा करणे आणि भावनाशीलता’ या अहंच्या पैलूची जाणीव करून दिली’, असे मला जाणवले. ‘परात्पर गुरुमाऊलीचे आपल्यावर सतत लक्ष असल्यानंतर आणखी कुणी विचारावे’, अशी अपेक्षा आपण का ठेवावी ?’, असे ते बोलल्यावर मी शांत झाले.

४ आ. नामजपाला बसल्यावर परात्पर गुरुमाऊलीला सूक्ष्मातून शस्त्रकर्म करण्यासंदर्भात विचारल्यावर त्यांनी शस्त्रकर्म आटोपून शारीरिक त्रासातून मोकळे होण्यास सांगणे आणि त्याविषयी पू. पात्रीकरकाकांना विचारल्यावर त्यांनीही असेच उत्तर देणे अन् ‘गुरुतत्त्व एकच आहे’, हे अनुभवायला मिळणे : आधुनिक वैद्यांनी मला गर्भाशयाचे शस्त्रकर्म करायला सांगितले होते; पण माझी द्विधा मनःस्थिती होती. मी नामजपाला बसल्यावर सूक्ष्मातून परात्पर गुरुमाऊलीला विचारले. तेव्हा गुरुमाऊलीने सांगितले, ‘पुढे आपत्काळ आहे. शस्त्रकर्म इत्यादी सर्व आटोपून शारीरिक त्रासातून मोकळे व्हा.’ ‘हे उत्तर गुरुदेवांचे आहे कि माझे ?’, अशी मला शंका होती. त्या वेळी मी पू. पात्रीकरकाकांना याविषयी विचारले असता त्यांनी परात्पर गुरुमाऊलीने सूक्ष्मातून उत्तर दिल्याप्रमाणे सांगितले. तेव्हा ‘संत आणि गुरुतत्त्व एकच आहेत’, हे अनुभवायला आले.

४ इ. ‘पू. पात्रीकरकाका ही निरपेक्ष प्रीतीची मूर्ती आहे’, असे वाटणे आणि ते बोलत असतांना त्यांच्या शब्दांकडे लक्ष न जाता ‘त्यांच्या वाणीतील चैतन्य ग्रहण करत रहावेे’, असे वाटणे : ‘पूजनीय काका ही निरपेक्ष प्रीतीची मूर्ती आहे’, असे मला वाटते. त्यांचे मार्गदर्शन ऐकतांना मला वाटते, ‘साधना किती सहज आणि सोपी आहे !’ ते बोलत असतांना माझे त्यांच्या शब्दांकडे लक्ष न जाता ‘त्यांच्या वाणीतील चैतन्य ग्रहण करत रहावे’, असे मला वाटते. ते बोलत असतांना ‘त्यांच्या वाणीतील चैतन्याचा माझ्या डोक्यावर वर्षाव होत आहे’, असे वाटून माझे डोळे जड होऊन मिटले जातात. ‘डोक्याभोवती चैतन्याची चक्रे फिरत आहेत’, असे मला वाटते. त्यांचे स्वर माझ्या अनाहतचक्राकडे जाऊन तहानलेल्याला पाणी मिळाल्यावर जसे तृप्त वाटते, त्याप्रमाणे मला जाणवते.

४ ई. मी त्यांच्या चरणांकडे बघितल्यावर माझ्या मनातील विचार थांबतात. त्यांचा गुरुदेवांप्रती भाव बघून मला परात्पर गुरुदेवांची तीव्रतेने आठवण येते. ‘त्यांचे चरण गुरुमाऊलींच्या चरणांप्रमाणेच आहेत’, असे मला वाटते.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे परात्पर गुरुमाऊली, या कलियुगात संतांचे दर्शनही दुर्लभ आहे. अशा घोर आपत्काळात आम्हाला संतांचे मार्गदर्शन मिळते, त्यांचा सहवास लाभतो’, ही तुझी अपार कृपा आहे. ‘प्रत्येक घरात आईच्या रूपाने देव अवतरला’, असे म्हणतात, तसे संतांच्या रूपाने हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली, तुम्ही आम्हाला दर्शन देऊन कृतकृत्य करत आहात. ‘कोणत्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करू ?’, हेच मला उमजत नाही. अनेक स्वभावदोष आणि अहं यांमुळे मी मागे पडते. त्यासाठी मी परात्पर गुरुमाऊली आणि पू. पात्रीकरकाका यांच्या चरणी क्षमायाचना करते. ‘तुम्हीच या दगडाकडून साधना करवून घ्या’, अशी मी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. कंचन श्याम शर्मा, अमरावती

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक