पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बांगलादेशच्या दौर्‍यावर !

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोदी यांचे स्वागत केले.

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २ दिवसांचा बांगलादेश दौरा प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदी २६ मार्च या दिवशी सकाळी बांगलादेशला पोचले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी विमानतळावर जाऊन मोदी यांचे स्वागत केले. या वेळी मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’नेही सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांचा कोरोना काळातील हा पहिलाच विदेश दौरा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी मोदी यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे.

या २ दिवसीय दौर्‍यात पंतप्रधान मोदी २७ मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरु हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळाला, तसेच इतर काही तीर्थस्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांना भेट देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असतील. या दौर्‍यामध्येच बंगालच्या जलपाईगुडी आणि बांगलादेशच्या ढाका या २ शहरांमधील रेल्वे सेवेचे उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याला विरोध म्हणून ढाका विद्यापिठात आंदोलन : २० जण घायाळ

पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याच्या निषेधार्थ बांगलादेशमध्ये आंदोलन

पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याच्या निषेधार्थ बांगलादेशमध्ये आंदोलन चालू आहे. ढाका विद्यापीठ परिसरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये २० जण घायाळ झाले. यामध्ये २ पत्रकार अणि सरकारचा पाठिंबा असलेल्या बांगलादेश छात्र लीगच्या २ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हे आंदोलन विविध साम्यवादी आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनांचा सहभाग असलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स अलायन्स’च्या वतीने करण्यात आले होते. त्या वेळी सरकारचा पाठिंबा असलेल्या विद्यार्थी संघटनांना या आंदोलकांवर आक्रमण केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.