सातारा, २२ मार्च (वार्ता.) – पाटण (जिल्हा सातारा) येथील ५० खाटांची क्षमता असलेल्या ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांची संमती मिळाली आहे, तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी लाखो रुपयांचा व्यय करण्यात आलेला असूनही कोरोनाच्या काळातही वैद्यकीय अधिकार्यांची वानवा आणि वैद्यकीय सुविधा पुरेशा नाहीत. येथे प्रतिदिन पाटण तालुक्यातून २०० हून अधिक रुग्ण या रुग्णालयात येतात. (जनतेला आरोग्यविषयक सुविधा पुरेशा प्रमाणात न देणे हा असंवेदनशीलतेचा कळसच म्हणावा लागेल. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून सुविधा त्वरित द्याव्यात, ही अपेक्षा ! -संपादक)
या रुग्णालयात १ वैद्यकीय अधीक्षक आणि ३ वैद्यकीय अधिकारी अशा किमान ३ आधुनिक वैद्यांची प्रशासकीय तरतूद आहे; मात्र यापैकी येथे कुणीही नाही. रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात आलेले केवळ दोनच आधुनिक वैद्य आहेत. अधीक्षक पद वर्षानुवर्षे रिक्त आहे, तसेच आधुनिक वैद्य, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कर्मचारी, औषधदाता, ‘स्वीपर’, ‘वॉर्डबॉय’, लेखनिक आदी बहुतांश पदेही रिक्त आहेत.
कोरोना काळातही हलगर्जीपणा !
कोरोना काळात पाटण तालुक्यात १२१ हून अधिक नागरिकांचा बळी गेला. प्रतिदिन १५० हून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणे, कोरोना आर्.टी.पी.सी.आर्. आणि अॅन्टीजेन चाचण्या करणे, यांसह आरोग्य शिबिरे, विविध लसीकरण आदी उपक्रमही घेतले गेले; मात्र यासाठी आवश्यक माहिती संकलक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुग्णालयाकडे नसल्याने पंचायत समिती आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही कामे पार पाडली जात आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गृहराज्यमंत्री यांनी लक्ष घालावे !
पाटण हा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ आहे; परंतु याच पाटण ग्रामीण रुग्णालयाची ही दुर्दशा झाली आहे. गृहराज्यमंत्री देसाई यांनी राज्यासह पाटण ग्रामीण रुग्णालयाकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पाटण येथील जनता व्यक्त करत आहे.