ठाणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले माहुलीच्या पायथ्याशी असलेल्या माहुली गावातील शिवकालीन तलावातील गाळ काढण्याचे आणि तलाव सुशोभित करण्याचे काम इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१४ या जागतिक महिला संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. या कामामुळे शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याच तलावात नव्याने पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर बांधण्यात येणार असून २२ पाडे आणि ५ गावांत पाणी पुरवठा करण्यासाठी ‘इनर व्हील’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. १८ मार्च या दिवशी शिवकालीन तलावाचा गाळ काढण्याच्या कामाचे भूमीपूजन ‘इनर व्हील’ संस्थेच्या सुभा चापवाले, सुनीता जैन आणि ज्योती कोटक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा माजी उपसभापती महेश धानके, उपसरपंच प्रदीप आगीवले, काँग्रेसचे वसिंद शहर अध्यक्ष रविशेठ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘इनर व्हील’ ही राष्ट्रीय पातळीवरील महिलांंची संघटना असून प्रतीवर्षी या संस्थेची जिल्हा शाखा ३१४ ही ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यात विविध सामाजिक अन् लोकोपयोगी उपक्रम राबवते. माहुली ग्रामपंचायत स्वयंपूर्ण करण्याचा मानस सुनीता जैन यांनी या वेळी बोलतांना व्यक्त केला.