|
मुंबई – माझी केंद्रशासनाला विनंती आहे की, त्याने स्फोटकांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. या प्रकरणाचे राज्यात निष्पक्ष अन्वेषण होईल, याची मला मुळीच निश्चिती नाही. केंद्रशासनानेही नीट चौकशी केली नाही, तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल आणि आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ, अशी चिंता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सोडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात राज ठाकरे यांनी २१ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना वरील मागणी केली.
या वेळी राज ठाकरे म्हणाले,
१. गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताकडे प्रती मासाला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. राज्यातील अन्य शहरांतील पोलीस आयुक्तांनाही गृहमंत्र्यांनी असे काही सांगितले आहे का, हे अद्याप पुढे आलेले नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांची कसून चौकशी होणे आवश्यक आहे.
२. सुशांत सिंह यांच्या हत्येचे प्रकरण बाजूला राहिले आणि वेगळेच विषय आले. त्यामुळे लोक मूळ विषय विसरून जातात. अंबानी यांच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. आजपर्यंत मी काय, सगळेच असा विचार करत होतो की, ‘बॉम्ब अतिरेकी ठेवतात. ‘बॉम्ब पोलीस ठेवतात’, असे आपण कधी ऐकलेले नाही.
३. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाली; मात्र परमवीर सिंह यांना पदावरून का हटवले ? त्यांचे स्थानांतर का केले गेले ? हे अद्याप सरकारने सांगितलेले नाही. सिंह यांचा या सर्वाशी काही संबंध होता का ? जर त्यांचा सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही ? सरकारने अंगावर आलेली गोष्ट अन्यांच्या खांद्यावर टाकली.
४. जगातील सर्वोत्तम पोलीस म्हणून मुंबई पोलीस दल ओळखले जाते. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणे, हे भयंकर आहे. याचे दायित्व घेऊन गृहमंत्र्यांनी त्यागपत्र द्यायला हवे.
५. मुळात अशी घटना वरिष्ठांच्या सांगण्याविना होऊ शकते का ? ही गाडी कुणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली ? या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी केंद्रशासनाने हस्तक्षेप करावा. याचे अन्वेषण झाले, तर अनेक धक्कादायक नावे बाहेर येतील.