वाई (जिल्हा सातारा) येथील तहसीलदारांचे आदेश धुडकावणार्‍या तलाठ्यांवर कारवाई !

भ्रष्ट प्रशासन !

सातारा, २१ मार्च (वार्ता.) – वाई (जिल्हा सातारा) येथील तहसीलदार रणजित भोसले यांनी आदेश देऊनही तलाठ्याने कोणतीही कारवाई न केल्याने अधिकाराचा उपयोग करत ओझर्डे येथील तलाठी डी.डी. कुंभार यांच्यावर कारवाई करण्यात आली.

१. मनोज भोईटे हे वाई तालुक्यातील ओझर्डे गावाच्या सीमेतील चंद्रभागा ओढ्यात अनधिकृतपणे वाळू उपसा करत होते. त्यांनी अनधिकृत वाळू उपसा करून सहस्रो रुपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक केली आहे, याविषयी तहसीलदार रणजित भोसले यांना समजले.

२. तहसीलदारांनी तलाठी कुंभार यांना वाळू चोरीच्या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार टाकलेल्या धाडीत चोरलेली वाळू आणि साहित्य कह्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.

३. तहसीलदारांनी वाळूचोर भोईटे यांना या प्रकरणी १ लाख १८ सहस्र रुपये दंडाची नोटीस पाठवली आणि भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले; मात्र तलाठी कुंभार यांनी आदेश धुडकावून वाळू चोरांसमवेत आर्थिक तडजोड केल्याचे तहसीलदारांना आढळून आले. त्यामुळे तहसीलदारांनी तलाठी डी.डी. कुंभार यांच्यावर कारवाई केली.