अमरनाथ यात्रेच्या काळात विनामूल्य लंगर चालवणार्‍या हिंदूंसाठी प्रशासनाकडून कठोर नियमावली !

  • लंगरवाल्यांची जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात याचिका

  • यात्रेतील मुसलमान हॉटेलचालकांच्या दबावामुळे नियमावली बनवल्याचा आरोप

हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची हॉटेल्स का आहेत ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो !

जम्मू – अमरनाथ यात्रेमध्ये हिंदु संघटना, संस्था, तसेच साधू यांच्याकडून यात्रेकरूंसाठी विनामूल्य लंगरची (भोजनाची) व्यवस्था करण्यात येते. काही लंगरमध्ये रहाणे आणि औषधोपचार हेही विनामूल्य केले जाते. आता या यात्रेमध्ये लंगर लावण्यासाठी प्रशासनाने लंगरवाल्यांवर अनेक अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्यांची पूर्तता करणार्‍यांनाच लंगर लावण्याची अनुमती मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात श्री अमरनाथ लंगर ऑर्गेनायजेशन (साबलो)ने अधिवक्ता अंकुर शर्मा यांच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘प्रशासनाच्या अटी या सनातन धर्मातील दान या मूलभूत तत्त्वाच्या अधिकारापासून वंचित करणार्‍या आहेत. घटनेच्या कलम २५ नुसार प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचे हे नियम उल्लंघन करणारे आहेत. त्यामुळे त्यांना रहित करण्यात यावे’, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

१. नव्या अटीनुसार लंगरचे आयोजन करणारे पूर्ण यात्रेमध्ये एकच लंगर चालवू शकतात. यामध्ये त्यांना कोणते भोजन देण्यात येणार आहे, याची माहिती सादर करावी लागणार आहे. पोलिसांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. लंगरच्या आयोजनाचा याविषयीचा अर्ज श्री अमरनाथ श्राइन बोर्डकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

अमरनाथ यात्रेतील लंगर

२. अर्ज करतांना वर्ष २०१८, २०१९ आणि २०२० ची सनदी लेखपालाने पडताळलेली ‘बॅलन्स शीट’ सादर करावी लागणार आहे. १० सहस्र रुपयांचा डिमांड ड्राम जमा करावा लागेल. लंगर सेवेमध्ये सहभागी सेवेकर्‍यांना गुन्हेगारी इतिहास असता कामा नये. अर्ज करणार्‍यांवर बोर्डाची उधारी किंवा दंड बसलेला नसावा. लंगरमध्ये सेवा करणार्‍या प्रत्येकाची पोलिसांकडून पडताळणी आवश्यक असणार आहे, आदी नियम प्रशासनाने बनवले आहेत.

३. लंगर चालवणार्‍या संस्थांंचे म्हणणे आहे की, लंगर चालवण्यासाठी मिळणारे बहुतेक साहित्य दान स्वरूपात मिळते. त्यामुळे त्याचा कोणताही आर्थिक व्यवहार नसतो आणि त्याचा कोणताही हिशोब ठेवला जातो. त्यामुळे बॅलन्स शीटचा कोणताही संबंध येत नाही. लंगरमध्ये काम करणारे वेगवेगळ्या ठिकाणावरून सेवा करण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे प्रत्येकाची पोलीस पडताळणी प्रमाणपत्र आणणे कठीण आहे.

मुसलमान हॉटेलचालकांच्या दबावामुळे प्रशासनाचा निर्णय

हिंदूंच्या संस्था आणि संघटना यांच्या लंगरमुळे या यात्रेच्या मार्गातील मुसलमान हॉटेलांचा व्यवसाय ठप्प पडलेला असतो; मात्र आता प्रशासनाच्या नियमामुळे हिंदूंचे लंगर बंद होऊन या मुसलमान हॉटेल व्यवसायिकांची चंगळ होणार आहे. त्यांच्याच दबावामुळे प्रशासनाने हिंदूंच्या लंगरांवर बंधने घालण्याचा प्रयत्न कल्याचा आरोपही श्री अमरनाथ लंगर ऑर्गेनायजेशन (साबलो)ने केला आहे.