१. प.पू. दास महाराज यांचे ध्यानावस्थेतील छायाचित्र
अ. प्रयोगाच्या वेळी मी जेव्हा प.पू. दास महाराजांच्या ध्यानावस्थेतील छायाचित्राकडे बघू लागलो, तेव्हा माझी दृष्टी त्यांच्याकडे एकाग्र झाली. मला आजूबाजूचे काही दिसेनासे झाले. मी आणि छायाचित्रातील प.पू. दास महाराज एवढ्यांचीच मला जाणीव होती.
आ. ‘प.पू. दास महाराजांचे ध्यानावस्थेतील छायाचित्र आपल्याला एका जागी खिळवून ठेवते आणि स्तब्ध करते’, असे मला जाणवले.
इ. माझ्या श्वासाची लय पुष्कळ धिमी झाली आणि मला शांत वाटू लागले.
ई. माझा नामजप होत नव्हता, तर माझे लक्ष केवळ श्वासावर केंद्रित झाले होते.
उ. प्रथम मला माझ्या मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवली आणि त्यानंतर २ मिनिटांनी मला सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवू लागली. दोन्ही चक्रांवर जाणवलेली स्पंदने शांतीची होती. माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
ऊ. त्यानंतर माझे ध्यान लागले. मला प्रयोग संपल्याचे समजले नाही. त्यामुळे मला ध्यानातून जागे करण्यात आले.
२. प.पू. दास महाराज यांचे ध्यानावस्थेतील हसरे छायाचित्र
अ. प.पू. दास महाराज यांचे ध्यानावस्थेतील हसरे छायाचित्र बघतांना ‘त्यांच्याकडे बघतच रहावे’, असे वाटत होते. तेव्हा माझ्याही ओठांवर स्मित उमटले. मला आनंद जाणवला.
आ. ‘प.पू. दास महाराजांच्या छायाचित्रातून प्रकाश बाहेर पडत आहे’, असे जाणवले. तसेच प्रयोगाच्या येथील वातावरण प्रकाशमान होऊन उजळल्याचे जाणवले.
इ. छायाचित्रातील प.पू. दास महाराजांमध्ये पुष्कळ जिवंतपणा जाणवला. ‘ते प्रत्यक्ष तेथे आहेत’, असे जाणवले.
ई. मला माझ्या मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली. मी अंतर्मुख झालो.
उ. माझा श्रीकृष्णाचा नामजप आपोआप चालू झाला.
ऊ. छायाचित्रातील प.पू. दास महाराजांकडे पुष्कळ वेळ बघत असतांना माझे ध्यान कधी लागले, हे मला समजले नाही.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
प.पू. दास महाराज यांच्या ध्यानावस्थेतील हास्य मुद्रा असलेल्या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना जाणवलेली सूत्रे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने प.पू. दास महाराज यांचे ध्यानावस्थेतील हास्य मुद्रा असलेले छायाचित्र पाहून त्याचा आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांवर काय परिणाम होतो ? याचा प्रयोग केला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि झालेले त्रास पुढे देत आहे.
१. अनुभूती
१ अ. प.पू. दास महाराज यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘महाशून्य’ हा नामजप आपोआप होणे : प.पू. दास महाराज यांचे ध्यानावस्थेतील हास्य मुद्रा असलेले छायाचित्र पाहिल्यावर ‘महाशून्य’ हा नामजप मनात चालू झाला. तो नामजप ३ – ४ घंटे माझ्या मनात चालू होता.
१ आ. मनातील विचारांनी अस्वस्थ होणे आणि ‘स्वतःकडे साक्षीभावाने पहायला हवे’, याची जाणीव होताच मनात पुन्हा नामजप होऊ लागणे : बराच वेळ झाल्यानंतर माझ्या मनात येणार्या विचारांमुळे मी अस्वस्थ झालो. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘कर्मप्रारब्धामुळे माझी स्थिती अशी झाली आहे आणि अनिष्ट शक्ती त्याचा अपलाभ उठवत आहेत. मी स्वतःकडे साक्षीभावाने पाहून हे शांतपणे सहन केले पाहिजे.’ हा विचार येताच माझे मन शांत झाले आणि माझ्या मनात नामजप चालू झाला.
२. झालेले त्रास
२ अ. प्रयोग चालू असतांना कुणीतरी बांधून ठेवल्यासारखे जाणवणे : ‘प्रयोग संपेपर्यंत कुणीतरी मला बांधून ठेवले आहे’, असे मला वाटत होते. त्यामुळे माझे संपूर्ण अंग दुखत होते. प.पू. दास महाराज यांच्या छायाचित्राजवळ जाऊन बसल्यावरही असेच वाटत होते. त्यामुळे माझ्या सर्व हालचाली मंदावल्या होत्या.
२ आ. प्रयोग चालू असतांना अकस्मात् थंडी वाजू लागणे : प्रयोग चालू असतांना मला अकस्मात् थंडी वाजू लागली. त्यामुळे मी शरिराचे मुटकुळे करून आसंदीत बसलो होतो. कुठल्याच स्थितीत मला बरे वाटत नव्हते.
३. प्रयोग संपल्यानंतर पुढचा संपूर्ण दिवस मला काहीच सुचत नव्हते. मला ‘काय करायचे ?’, हेही कळत नव्हते.
– एक साधक
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |