एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने १५.११.२०२० या दिवशी ‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वर ‘कोरोना विषाणू – आध्यात्मिक कारणे आणि नवीन आरंभ’ या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री. क्लॉस ग्लात्झेल (‘ओकिटॉक’चे मालक) होते आणि एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले अन् साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांनी विषयाचे सादरीकरण केले.
१. एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. हान्स मार्टिन हेअर्लिंगे यांच्या प्रयत्नांमुळे ‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वर विषय मांडण्याची संधी मिळणे
एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. हान्स मार्टिन हेअर्लिंगे यांनी ‘ओकिटॉक’ या ‘ऑनलाईन रेडिओ’वर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून या कार्यक्रमासाठी रविवारी रात्री ८ वाजताची वेळ मिळाली. २ घंट्यांचा हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला.
२. कार्यक्रमाचे पहिले सत्र
२ अ. पहिल्या सत्रात गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांनी ‘कोरोना विषाणू – आध्यात्मिक कारणे’ हा विषय मांडला.
२ आ. या कार्यक्रमात ५ मिनिटे सामूहिकरित्या नामजपही केला, तसेच ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलना’च्या प्रक्रियेची माहिती देऊन उदाहरणदाखल पुढील दोन स्वयंसूचना सर्वांना सांगितल्या.
२ आ १. काळजी करणे : जेव्हा मला ‘स्वतःला कोरोना विषाणूची लागण होईल’, अशी भीती वाटत असेल, तेव्हा ‘मी शक्य ती सर्व सावधानता बाळगून नामजपादी उपायही करत आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी शांत होऊन नामजप करीन.’
२ आ २. ताण येणे : जेव्हा मला ‘सध्याच्या परिस्थितीत सर्वकाही करणे कसे शक्य होईल ?’, असे वाटून ताण येईल, तेव्हा ‘मी शांत राहिल्यास मला सर्वकाही करणे अधिक चांगल्या रितीने शक्य होणार आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी शांत होऊन नामजप करीन.’
३. कार्यक्रमाचे दुसरे सत्र
३ अ. शंकानिरसन : कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात सद्गुरु सिरियाक वाले यांना काही श्रोत्यांनी ‘चॅट’द्वारे, तर नावनोंदणी केलेल्या श्रोत्यांनी बोलून प्रश्न विचारून स्वतःच्या शंकांचे निरसन करून घेतले.
जिज्ञासूंनी ‘आपल्यात अंतर्यामी ईश्वर असतांना आपल्या सर्वांमध्येच स्वभावदोष असतात’, असे तुम्ही का म्हणता ?’, आपल्यात ईश्वर आहे, तर आपल्याकडून चुका कशा होऊ शकतात ?’, ‘आपण जर दैवी स्वर ऐकू शकत असू, तर तोच आपल्यात पालट घडवेल. मग आपल्याला स्वयंसूचना घेण्याचे कारण काय ?’, ‘तीव्र डोकेदुखीवर कशी मात करावी ?’, असे प्रश्न विचारले, तसेच ‘ॐ’च्या नामजपाविषयी शंका विचारल्या.
३ आ. मधल्या वेळात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि श्रीराम अन् दत्तगुरु यांची भक्तीगीते लावण्यात आली.
४. या कार्यक्रमानिमित्त झालेला अध्यात्मप्रसार आणि भविष्यकाळात उपलब्ध झालेल्या संधी
अ. ‘हा कार्यक्रम अनुमाने एक सहस्र लोकांनी ऐकला’, असे श्री. क्लॉस ग्लात्झेल यांनी आम्हाला सांगितले. त्या दिवशी सायंकाळी एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणार्या व्यक्तींमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. ‘ऑकिटॉक रेडिओ’ने एस्.एस्.आर्.एफ्.ला प्रत्येक मासातील दुसर्या रविवारी २ घंट्यांचे सत्र घेण्यास आमंत्रित केले आहे.
आ. सध्या ‘ऑकिटॉक’ एक दूरचित्रवाणी वाहिनी चालू करण्याच्या प्रयत्नात आहे. ही वाहिनी चालू झाल्यावर त्या वाहिनीवरही असाच कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित केले आहे.
इ. श्री. क्लॉस ग्लात्झेल यांचे मित्र आणि ‘ऑकिटॉक रेडिओ’च्या इंग्रजी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारे श्री. राफेल केमेन्झी यांच्या समवेत इंग्रजी भाषेत सद्गुरु सिरियाक वाले यांचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
५. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांना आलेल्या अनुभूती
५ अ. ‘ऑकिटॉक रेडिओ’च्या प्रसारण कक्षात त्रास जाणवून लक्ष केंद्रित करणे अवघड होणे आणि कार्यक्रम चालू झाल्यावर चैतन्याच्या कवचात सुरक्षित असल्याचे जाणवणे : ‘ऑकिटॉक रेडिओ’चा प्रसारण कक्ष आमच्या घराजवळ असल्याने या कार्यक्रमासाठी मी तेथे गेले होते. तेथे पुष्कळ आध्यात्मिक त्रास असल्याचे मला जाणवले. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी मी नामजप करून भावजागृतीचे प्रयत्न करू लागले. तेथे लक्ष केंद्रित करणे अवघड होत होते. कार्यक्रम चालू होताच ‘मी चैतन्याच्या कवचात असून सेवा पूर्ण होईपर्यंत माझे रक्षण होत आहे’, असे मला जाणवत होते.
५ आ. सद्गुरु सिरियाक वाले यांनी एका जिज्ञासूने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर प्रसारण कक्षात हलकेपणा जाणवू लागला. तेथे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते.
५ इ. मी घरी जायला निघाले, तेव्हा मी चैतन्याने भारित झाल्याचे मला जाणवत होते.
‘परात्पर गुरु डॉक्टरांंनी आध्यात्मिक शक्ती प्रदान करून आमचे रक्षण केल्यामुळे ही सेवा होऊ शकली’, त्याविषयी आम्ही सर्व जर्मन भाषिक साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की
संकलक : (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (डिसेंबर २०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |