दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मालकाकडून अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार !; तरुणाकडून आई-वडिलांची हत्‍या !…

मालकाकडून अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार !

वसई – येथील आस्‍थापनात काम करणार्‍या १६ वर्षांच्‍या मुलीवर आस्‍थापन मालक प्रदीप प्रजापती (वय ५० वर्षे) याने सलग दोन दिवस बलात्‍कार केला. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी आस्‍थापनाच्‍या कार्यालयात आणि गच्‍चीवर ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून फरार आरोपीचा शोध चालू आहे.

संपादकीय भूमिका : अशा वासनांधांना कठोर शिक्षा व्‍हायला हवी !


तरुणाकडून आई-वडिलांची हत्‍या !

तरुण पिढीमधील संयम नष्‍ट झाल्‍याचे दर्शवणारी घटना !

नागपूर – अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा उत्‍कर्ष डोखोळे (वय २४ वर्षे) सातत्‍याने अनुत्तीर्ण होत असल्‍याने त्‍याला आई-वडिलांनी वारंवार टोमणे मारले. त्‍यांनी त्‍याला शेती करण्‍याचा सल्ला दिला; पण ते सहन न झाल्‍याने त्‍याने आई-वडिलांची हत्‍या केली. आईचा गळा दाबून तिला ठार केले, तर वडिलांच्‍या मानेवर चाकूने वार करून त्‍यांना ठार केले.


विशाल गवळी याला २ दिवसांची पोलीस कोठडी

कल्‍याण – येथील बालिकेवर अत्‍याचार करून तिची निर्घृण हत्‍या करणार्‍या मारेकरी विशाल गवळीसह त्‍याची पत्नी साक्षी यांना पोलिसांनी त्‍यांच्‍या पोलीस कोठडीची ८ दिवसांची मुदत संपल्‍याने कल्‍याण जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयात उपस्‍थित केले होते. या वेळी न्‍यायालयाने त्‍यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


तक्रार आल्‍यासच अर्जाची छाननी !

मुंबई – लाडकी बहीण योजनेच्‍या अंतर्गत लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्‍त झाल्‍यास तिच्‍या अर्जाची छाननी होईल. त्‍यानुसार निकषबाह्य भरलेले अर्ज अपात्र होतील, असा निर्णय झाल्‍याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. उत्‍पन्‍नात झालेली वाढ, चारचाकी असलेल्‍या महिला, आंतरराज्‍य विवाह केलेल्‍या महिला, आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असणे हे प्रकार लक्षात आणून दिल्‍यास संबंधित महिला अपात्र ठरेल.


बेकायदेशीर कृत्‍य करणार्‍या ७८ जणांवर कारवाई !

नवी मुंबई – नवी मुंबई पोलीस आयुक्‍तालयातील परिमंडळ-१ परिसरामध्‍ये ३१ डिसेंबरच्‍या रात्री बेकायदेशीर कृत्‍य करणार्‍या ७८ जणांवर, तसेच नियमभंग करणारे १८ बार आणि हुक्‍का पार्लर यांच्‍यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्‍यांच्‍याविरोधात विविध पोलीस ठाण्‍यात गुन्‍हे नोंदवले आहेत.