‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चा उपक्रम
पुणे – युवकांकडून गडाचे पावित्र्यभंग होऊ नये, गडदुर्ग आणि संरक्षित स्मारके यांच्या पावित्र्य रक्षणासाठी कार्यरत ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’कडून वन विभागाच्या सहभागातून ३१ डिसेंबर या दिवशी सिंहगडाच्या पायथ्याशी ‘गडरक्षण मोहीम’ राबवण्यात आली. वन विभागाकडून उपनगरातील टेकड्या आणि जिल्ह्यांतील अभयारण्यांमध्ये दिवसभर अन् रात्रीही गस्त (पहारा) वाढवण्यात आली होती. वन विभाग वनव्यवस्थापन समिती, घेरा सिंहगडचे कर्मचारी आणि ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चे पदाधिकारी अन् कार्यकर्ते यांनी सकाळपासूनच घाटरस्त्याने गडावर जाणार्या वाहनांची पडताळणी चालू केली होती. या वेळी मद्य, मांसाहारी पदार्थ, धूम्रपानाचे साहित्य घेऊन गडावर जाणार्या पर्यटकांना रोखण्यात येत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल गोणते, प्रशांत हरेकर, नीलेश पारीख, मयुर लोयरे, हर्षल तापकीर, शुभम चांदेरे, सुनील गवारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.
‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चे संस्थापक महेश पवळे यांनी सांगितले की, गडावर जाणार्या पर्यटकांना गडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व आम्ही पटवून दिले. प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून ‘गड स्वच्छता अभियान’ आणि गड रक्षणासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत असतात. या मोहिमांमध्ये वन विभागाचे आम्हाला साहाय्य लाभते.